‘लसूण'ची फोडणी महाग
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात मागील काही महिन्यांपासून ‘लसूण'ची आवक रोडावली असल्याने दर लसूण वधारलेलेच आहेत. यंदा लसणाचे दर उतरण्याचे नाव घेत नसून, लसूण दरात दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो लसूण ३०० ते ३५० रुपये तर किरकोळ बाजारात ४०० ते ४५० रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. त्यामुळे ‘लसूण'ची फोडणी महाग पडत आहे.
बाजारात जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे सुरुवातीला लसणाचे दर मागील दोन वर्षीच्या तुलनेत आवाक्यात होते. परंतु, एप्रिल महिन्यापासून लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासुन लसणाच्या दरात वाढ होत असून, दिवसागणिक लसूण दर वधारत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी एपीएमसी बाजारात अवघ्या ५ गाड्या लसूण आवक झाली. त्यामुळे लसूण दरात वाढ झाली आहे. लसणाची लागवड कमी असल्याने दर तेजीत आहेत. यापुढेही लसणाचे दर आणखी वधारतील, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
मध्य प्रदेश मध्येही पाऊस पडल्याने, सततच्या पावसाने लसूण उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन लसूण उत्पादन देखील कमी होणार असून, लसूण दर चढेच राहतील, अशी शक्यता कांदा-बटाटा व्यापारी विनोद निकम यांनी वर्तवली आहे.