नवी मुंबईत विविध समाज घटकांमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असून १५०-ऐरोली आणि १५१- बेलापूर विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त तथा दोन्ही मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक पातळीवर विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात येत आहे.

या अंतर्गत ५ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी नाका कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये १५०-ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वीपचे अधिकारी, कर्मचारी यांनी रबाले आणि तळवली नाका तसेच सेक्टर-४ ऐरोली येथील नाक्यांवरील नाका कामगारांची भेट घेत त्यांच्यामध्ये मतदान करण्याविषयी जागरुकता निर्माण केली.

अशाच प्रकारे ऐरोली विभागात चिंचपाडा आणि गणेशनगर येथील रहिवाशांना मतदानाचा ‘भारतीय संविधान'ने दिलेला अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी नमुंमपा शाळा क्रमांक-५३ चिंचपाडा येथे नागरिकांना एकत्र करुन सामुहिकरित्या मतदार प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी उपायुक्त संतोष वारुळे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबईतील विविध समाज घटकांशी संपर्क साधून २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे ‘नमुंमपा'कडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘लसूण'ची फोडणी महाग