उलवे सिलेंडर स्फोट प्रकरणात मृत किराणा दुकान मालकाविरुध्द गुन्हा
उलवे : उलवे, सेक्टर-१७ मधील जावळे गावातील श्री हनुमान सुपर मार्केट या किराणा स्टोअरमध्ये ३० ऑक्टोबर रोजी रात्री सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील मृत रमेश भाटी याने त्याच्या किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी अवैधरित्या आणि बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा साठा निष्काळजीपणे हाताळला. परिणामी, या ठिकाणी आग लागून सिलेंडरचा स्फोट होऊन सदर दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे उलवे पोलिसांनी या दुर्घटनेतील मृत किराणा दुकान मालक रमेश भंवरलाल भाटी (४५) याला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत रमेश भाटी उलवे, सेक्टर-१७ येथील जावळे गावात श्री हनुमान सुपर मार्केट या नावाचे किराणा दुकान चालवत होता. तसेच तो दुकानाच्या पाठीमागेच पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. उलवे येथे पेट्रोलपंप नसल्यामुळे या नोडमधील काही किराणा मालाचे दुकानदार आपल्या दुकानातून काळ्या बाजारात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंटरची विक्री करत होते. रमेश भाटी देखील आपल्या किराणा मालाच्या दुकानातून पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकत होता. ३० ऑक्टोबबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास श्री हनुमान सुपर मार्केट या किराणा दुकानात अचानक आग लागली होती.
या आगीच्या संपर्कात आलेल्या दुकानातील १४ किलोचा एक आणि ५ किलोचे २ अशा एकूण ३ सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात स्वतः रमेश भाटी, त्याची पत्नी मंजू भाटी (३५), मुलगी लक्ष्मी भाटी (१४), मुलगा चेतन उर्फ लक्ष्मण भाटी (१४) असे चौघेजण गंभीररित्या होरपळले गेल्याने त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी रमेश भाटी याचा मृत्यू झाला. या स्फोटामध्ये रमेश भाटी याचे संपूर्ण कुटुंब मयत झाले आहे. त्याचप्रमाणे या स्फोटात त्याचे दुकान आणि घर देखील संपुर्ण जळून खाक झाले आहे. रमेश भाटी याच्या दुकानात आग लागल्यानंतर रमेश भाटी आणि त्याच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेजारील चिकन विक्रेता दिलशाद अली (२१) देखील या दुर्घटनेत गंभीरपणे जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, सदर दुर्घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत मृत रमेश भाटी याने त्याच्या किराणा दुकानामध्ये अवैधपणे आणि बेकायदेशीररित्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले आहे. सदर पेट्रोल आणि डिझेल निष्काळजीपणे हाताळले गेल्यामुळे भाटी याच्या दुकानात आग लागल्याचे आणि या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन आगीची दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे सदर घटनेला मृत किराणा दुकान मालक रमेश भाटी जबाबदार असल्याचे आढळून आल्याने उलवे पोलिसांनी त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.