उल्हासनगर पोलिसांचा शहरात रुटमार्च

उल्हासनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करणे आणि निवडणूक आचारसंहितेचे पालन व्हावे या उद्देशाने उल्हासनगर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी रुट मार्च काढला. रुटमार्च लोकवस्तीच्या परिसरातून मतदान केंद्रे आणि बुथजवळून, पोलीस स्टेशन परिसरात गेला. याठिकाणी नागरिकांना मेगाफोनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले. याशिवाय आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ ११२ नंबर डायल करा किंवा थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असा संदेशही देण्यात आला.

भगवती नवनी मंच गोल मैदान येथून रुटमार्चला सुरुवात झाली. रुटमार्च खासदार कार्यालय, मधुबन चौक, आमदार कुमार ऐलानी यांचे कार्यालय, पटेल लो प्राईस, नेहरु चौक, शिरु चौक, भारत चौक, उल्हासनगर पोलीस स्टेशनसमोर, बस स्टॉप क्रमांक १, शिव रोड, बिर्ला गेटपर्यंत, त्यानंतर भारत चौकातून निघून उल्हासनगर पोलीस ठाणे रॅलीची सांगता करण्यात आली.

पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे (गुन्हे शाखा), सीआयएसएफ अधिकारी आणि २४ जवान, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे ६ अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी या रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत विविध समाज घटकांमध्ये मतदार जनजागृती