वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमास ‘जॉय ऑफ गिव्हिंग'ची दीपावली भेट
नवी मुंबई : ‘जॉय ऑफ गिव्हिंग' ह्या सोशल ग्रुपच्या वतीने सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दिवाळी भेट उपक्रमाचे आयोजन २ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी ह्या अनाथालयातील जवळपास ५२ बालिका व वृद्धांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ‘जॉय'चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमावेळी ‘जॉय'चे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप, ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे उपअभियंता प्रदीप पाटील, नेरुळ युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वात्सल्यचे व्यवस्थापक बापूराव काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. १९८३ साली स्थापन झालेल्या वात्सल्य ट्रस्टने आजवर हजारो बालिका व वृद्धांना मायेचा आधार दिला आहे. ज्येष्ठ व बालिका असे आजी-नातींचे अनोखे नाते येथे पाहायला मिळते. आपल्या प्रास्ताविकात वैभव पाटील यांनी उपस्थितांना ‘जॉय'च्या कार्याची माहिती देत सोबत आलेल्या सदस्यांची विस्तृतपणे ओळख करू दिली. वात्सल्य ट्रस्ट करत असलेले कार्य एकमेवाद्वितीय असून ह्या संस्थेने आजवर हजारो निराधार व्यक्तींना मायेचा आधार दिला असल्याचे स्पष्ट करत मुलांना योग्य शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर संस्थेच्या कार्यास हातभार लावण्याचा सल्ला दिला. यावेळी सुभाष हांडे देशमुख, डॉ घोलप, अभियंता प्रदिप पाटील यांनीदेखील मनोगते व्यक्त करत सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गणेश हिरवे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी ‘जॉय'च्या सदस्यांनी जमा केलेली मात्र त्यांनी नाकारलेली आर्थिक मदत या उपक्रमासाठी देऊ केली. यावेळी मुलांना व वृद्ध व्यक्तींना दिवाळीचा फराळ, पेन, पुस्तक, मिठाई व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘जॉय' चे समन्वयक वैभव पाटील, सभासद गजानन पाटील, दत्ता रातवडकर, विजय फणसेकर, निलेश घोडविंदे आदींनी मेहनत घेतली.