भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांच्या वक्तव्याची रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिलगिरी
उल्हासनगर : उल्हासनगर येथील सभेमध्ये ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात' या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘शिवसेना'ने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत ‘भाजपा'च्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अखेर ना. रविंद्र चव्हाण यांनी प्रदीप रामचंदानी यांना फटकारत दिलगिरी व्यक्त केली आहे. पण, या वादामुळे निवडणूक रंगतदार वळणावर आली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा'चे उमेदवार कुमार आयलानी यांच्या सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. रामचंदानी यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करुन ‘भाजपा'च्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. या वादामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या उल्हासनगरातील निवडणूक अधिकच तापली आहे.
दुसरीकडे ‘महायुती'च्या मेळाव्यात रामचंदानी यांच्या सदर वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ना. रविंद्र चव्हाण यांनी धाव घेतली. ३ नोव्हेंबर रोजी उल्हासनगरातील टाऊनहॉल येथे ‘महायुती'च्या मेळाव्यात त्यांनी आपल्या भाषणात रामचंदानी यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘शिवसेना'च्या बहिष्काराच्या भूमिकेची गंभीर दखल घेत, रवींद्र चव्हाण यांनी रामचंदानी यांची कानउघाडणी केली. तसेच यापुढे प्रदीप रामचंदानी यांना प्रचार सभांतून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. उल्हासनगर मतदारसंघात ‘भाजपा'चे विद्यमान आमदार कुमार आयलानी आणि ‘राष्ट्रवादी'चे ओमी कलानी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. ‘भाजपा'मध्ये आयलानी यांच्या नावाची घोषणा अंतिम क्षणी झाल्याने अंतर्गत नाराजी निर्माण झाली होती. आता रामचंदानी यांच्या वक्तव्यामुळे ‘शिवसेना'चा असहकार निर्माण झाल्याने आयलानी यांची निवडणूक अजुनच कठीण झाली आहे.
रामचंदानी यांच्या ‘गद्दार' वक्तव्यानंतर उल्हासनगरातील शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी रामचंदानी यांनी माफी न मागितल्यास कुमार आयलानी यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या बहिष्काराच्या भूमिकेने ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. अखेर ना. रविंद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करत सदर वादग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला खरा; पण तरीही ‘शिवसेना'च्या तीव्र भूमिकेने निवडणुकीच्या रंगतदार वातावरणात अजुनही राजकीय खळबळ कायम आहे.
या वादामुळे उल्हासनगरातील निवडणुकीचा रंगतदार खेळ अधिकच गडद होत आहे. ‘भाजपा'चा अंतर्गत असंतोष, ‘शिवसेना'चा बहिष्कार आणि प्रदीप रामचंदानी यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेली खळबळ यामुळे उल्हासनगरातील निवडणुकीच्या प्रचारात नवीन वळण आले आहे. ‘भाजपा'साठी या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या वादग्रस्त स्थितीचा मतदानावर काय परिणाम होईल? ते पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.