आ. मंदाताई म्हात्रे, आ. गणेश नाईक यांना बंडखोरांचे आव्हान

चुरस वाढली; बेलापूर, ऐरोली मतदारसंघात तिरंगी लढत?

नवी मुंबई : नवी मुंबईतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदार संघात भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासह आता ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्ष'चे संदीप नाईक आणि ‘महायुती'मध्ये बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढणारे शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ‘मनसे'चे गजानन काळे हेही या मतदारसंघात उभे असून मागील निवडणुकीत त्यांना २७ हजार मते मिळाली होती.

तर दुसरीकडे १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या मतदारसंघात ‘महायुती'चे उमदवार आमदार गणेश नाईक यांच्यासमोर बंडखोरी करीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी देखील आपली अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील ‘महायुती'चे गणेश नाईक, ‘महाविकास आघाडी'तर्फे ‘शिवसेना'चे मनोहर (एम.के.) मढवी आणि अपक्ष विजय चौगुले यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघात आता ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना त्यांचेच पूर्वाश्रमीचे शिष्य विजय चौगुले आणि एम. के. मढवी कसे आव्हान देतात, ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणूक-२०२४ करिता ४ नाव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर अशोक गावडे (अपक्ष), निवास साबळे (आरपीआय-ए), शांताराम शेट्टी (अपक्ष), नवीन प्रतापे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), बाबू अक्रम (अपक्ष), ॲड. गुरुदेव सूर्यवंशी (अपक्ष), राहुल शिरसाठ (अपक्ष), संतोष कांबळे (अपक्ष), डॉ. अमरदीप गरड (अपक्ष) या ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून ‘महायुती'कडून बंडोबांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, बेलापूर मध्ये विजय नाहटा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे.

बेलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि ‘राष्ट्रवादी'चे संदीप नाईक यांच्यात थेट लढत होणार होती. परंतु, विजय नाहटा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता येथे तिरंगी लढत होणार आहे. विजय नाहटा यांनी गेले वर्षभर विविध उपक्रम बेलापूर मतदारसंघात राबवून शहरी, झोपडपट्टी तसेच ग्रामस्थ नागरिकांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नाहटा ‘महायुती'ची मते खातात की बाजी मारतात, ते देखील २३ नोव्हंेबर रोजी स्पष्ट होईल. तरीही एकंदरीत परिस्थिती बघता बेलापूर मतदारसंघात चुरशीची लढाई होणार असल्याचे दिसत आहे.

बेलापूर मतदारसंघात ‘भाजपा'चे पारडे जड...
बेलापूर विधानसभा मतदारसंघात सध्या तरी ‘भाजपा'चे पारडे जड असल्याचे चित्र आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये ‘बेलापूर'मध्ये ‘भाजपा'च्या सुरेश हावरे यांचा पराभव करत ‘राष्ट्रवादी'चे गणेश नाईक आमदार पदी निवडून आले होते. पण, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘भाजपा'च्या सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीतही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पुन्हा एकदा विजयश्री मिळवत आपली आमदारकी कायम राखली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी ‘राष्ट्रवादी'तर्फे आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात ‘भाजपा'चे पारडे जड असल्याने संदीप नाईक यांना करिष्मा करावा लागणार आहे.

ऐरोली मतदारसंघात गुरु-शिष्यांमध्ये लढत...
ऐरोली मतदारसंघामधये आ. गणेश नाईक नाईक ‘भाजपा'कडूनच निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात ‘महाविकास आघाडी'कडून ‘शिवसेना'चे मनोहर मढवी आणि अपक्ष विजय चौगुले निवडणूक लढत आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडकीत नाईक यांनी दोन वेळा विजय चौगुले यांचा पराभव केला आहे. विजय चौगुले आणि मनोहर मढवी यापूर्वी गणेश नाईक यांंचे शिष्य राहिलेले असून नाईक यांच्या तालमीतच हे दोघे जण तयार झालेले आहेत. त्यामुळे ऐरोलीत गुरु आणि दोन शिष्यांमध्ये कशी लढत होते? ते पाहणे औत्सुवयाचे ठरणार आहे. 

दुसरीकडे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणारे गणेश नाईक यांनी १९९७ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बिनसल्याने १९९९ मध्ये नाईक यांनी ‘शिवसेना'ला जय महाराष्ट्र करीत शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी'मध्ये सामिल झाले. १९९९ च्या निवडणुकीत ‘शिवसेना'च्या सीताराम भोईर यांच्याकडून गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. पण, २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी'च्या तिकीटावर सलग दोन वेळा विजय संपादित केला. यानंतर नाईक यांनी २०१९ ‘भाजपा'मध्ये प्रवेश करुन ‘महायुती'मधून ऐरोली मतदारसंघातून निवडून आले. पण, आता या निवडणुकीत गणेश नाईक यांना ‘महाविकास आघाडी'चे एम. के. मढवी आणि अपक्ष विजय चौगुले यांनी कडवे आव्हान दिले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. प्रशांत ठाकूर यांचे ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात भरभरुन स्वागत