वाहतुक नियमांचे उल्लंघन

तुर्भे : वाशी वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९१ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतुक विभाग) तिरुपती काकडे यांच्या आदेशाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई शहरामध्ये रिक्षा चालकांकडून रिक्षामध्ये नियमापेक्षा अतिरिक्त प्रवासी भरणे तसेच रिक्षा चालकाच्या दोन्ही बाजूंना प्रवासी भरुन त्यांची वाहतुक केली जात होती. याशिवाय काही रिक्षा चालक गणवेश परिधान न करता तसेच बॅच न लावता प्रवासी वाहतुक करत होते. त्यामुळे एखाद्या प्रवाशाला प्रसंगी संबंधित रिक्षा चालकाची तक्रार करावयाची झाल्यास त्याचा बॅच नंबर उपलब्ध होत नव्हता. परिणामी नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक मोकाट सुटत होते. या प्रकरणी प्रवाशांनी वाहतुक नियंत्रण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. रिक्षाचालक आणि मालकांमध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याचे दृष्टीने प्रबोधन करण्यात आले होते. तसेच वाहतुक विभागाने या प्रकरणी विशेष मोहीम घेतली. या अंतर्गत रिक्षा मध्ये मागे किंवा पुढे नियमापेक्षा अतिरिक्त प्रवासी भरणाऱ्या (ओव्हर सिट), गणवेश परिधान न करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालकांच्या विरुध्द करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ३९१ केसेस दाखल करुन १ लाख ८५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढे देखील वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांविरुध्द कारवाई चालू ठेवण्यात येणार असून, रिक्षा चालक आणि मालकांमध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘दिवाळी पहाट' कार्यक्रमांसह विविध ठिकाणी मतदार जनजागृती