ठाणे महापालिकाचे पुनर्निर्माण अभियान

ठाणे : ठाणे महापालिका तर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' या मोहिमेत पुनर्निर्माण अभियान हाती घेतले आहे. या अभियान मध्ये दीपावलीत जमा होणारा सुका कचरा संकलित करुन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संकलन केंद्रे सुरु केली आहेत. सदर संकलन केंद्रे ६ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहेत.

दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ रहावे तसेच निर्माण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, असा या ‘पुनर्निर्माण अभियान'चा उद्देश आहे. दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भेटवस्तुंसह इतर प्रकारची खरेदी होते. त्यामुळे इतर दिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबतच दिवाळी सणाच्या काळात जास्तीचा सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे संकलन करुन त्यावर प्रक्रिया करण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. या ‘अभियान'साठी महापालिका क्षेत्रात, परिसर भगिनी (स्त्री मुक्ती संघटना), समर्थ भारत व्यासपीठ, आँटी प्लास्टिक ब्रिगेड या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

हिरानंदानी इस्टेट, भूमी एकर, लोढा अमारा, हिरानंदानी वन, दोस्ती इम्पेरिया, सिध्दांचल, हिरानंदानी मेडोज या मोठ्या गृहसंकुलांसोबत, डी-मार्ट, टिकुजीनी वाडी येथेही सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दररोज सुमारे ३० हजार घरापर्यंत सदर अभियान पोहोचवण्यात येईल. या काळात सुमारे २५० टन सुका कचरा गोळा होईल, असा अंदाज आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील मुख्य संकलन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबतची माहिती घेतली. तसेच स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या संकलन केंद्रांवर सुका कचरा जमा करावा. त्यामुळे स्वच्छता राखली जाईल आणि सुक्या कचऱ्यातून पुनर्निर्माण करणे शक्य होईल, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले.

तत्पूर्वी, संकलन केंद्रांमधील कचरा एकत्र केला जाणार असलेल्या मुख्य संकलन केंद्राचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते ३० ऑवटोबर रोजी उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, आदि उपस्थित होते.

नागरिकांनी सुका आणि ओला कचरा याचे वर्गीकरण करुन, सुका कचरा महापालिकेच्या या संकलन केंद्रात किंवा प्रभाग समिती कार्यालयात असलेल्या ‘आर आर आर' केंद्रात द्यावा. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील, असा विश्वास वाटतो.
-मनिष जोशी, उपायुक्त-घनकचरा व्यवस्थापन, ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतुक नियमांचे उल्लंघन