‘हास्यसंध्या'मध्ये रंगले नवी मुंबईकर

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना को जागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारुन जागी करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून ‘नवी मुंबई प्रेस क्लब'ने एक अनोखे पण लोकप्रिय जेष्ठ कवींच्या हास्य संध्येचे आयोजन वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे केले होते.

विडंबन, हास्य कविता आणि खुर्चीला मध्य समजून मारलेल्या गप्पांमुळे तसेच मार्मिक, खुसखुशीत भाष्यामुळे कार्यक्रम नवी मुंबईकरांची दाद मिळवून गेला. लोकांच्या सामाजिक जाणिवेला हात घालणाऱ्या या ‘हास्यसंध्या'चे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवि महेश केळुसकर यांनी नेहमीच्या हास्य चौकार आणि षटकारांनी केले.

अमरावतीहून आलेले जेष्ठ कवी मिर्झा बेग महाराष्ट्राला जांगडगुट्टा आणि मिर्झा एक्सप्रेस यामुळे परिचित आहेतच. त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात वऱ्हाडी भाषेतील कवितेने करुन समयोजित किस्से, विनोद सांगून ‘काव्यसंध्या'ला छानशी सुरुवात करुन दिली. जेष्ठ कवी आणि महाराष्ट्राला विडंबनकार म्हणून सुपरिचित असलेले रामदास फुटाणे यांनी कसदार खेळाडुसारखे विडंबनाचे फटके मारुन तथा पूर्वीच्या त्यांच्या विडंबन कविता आजही किती समायोचित वाटतात, ते दाखवून देत आता कवी म्हणून थांबावेसे वाटते, अशी खंत बोलून दाखवली.

ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक श्रीकांत बोजेवार त्यांच्या तंबीदुराई स्तंभ लेखनामुळे प्रसिध्द आहेतच; पण आजच्या सद्यपरिस्थितीला त्यांनी काव्यातून घेतलेले चिमटे लाजवाबच होते. तर महेश केळुसकर यांनी त्यांचीच एक कविता नेत्यांच्या बायकांचे उखाणे अशी काही पेश केली की टाळ्यांच्या कडकडाटाने विष्णुदास भावे सभागृह दणदणून गेले.

यावेळी ब्रेकींग न्युजसाठी महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांनी पळून नेलेले अथवा हॉटेलात ठेवलेले नेते तिथे काय करतात, याची ब्रेकिंग न्युजच नवी मुंबईकरांना आपल्या किश्यांद्वारे दिली. महेश केळुसकर यांनी सूत्रसंचालनासोबतच त्यांच्या राजकीय व्यंग कविता सादर केल्या. सध्याच्या राजकीय वातावरणात, राजकारणाचा संदर्भ घेऊन व्यंगाची साथ असताना रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची कसब या कवी लोकात आहे, हे मात्र निर्विवाद.

सदर ‘हास्यसंध्या'ला उपस्थित राहिलेले ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. केलास शिंदे, सह-पोलीस आयुवत संजयसिंह येनपुरे यांच्यासह विविध शासकीय-पोलीस अधिकारी तसेच नवी मुंबईतील इतर मान्यवरांनी हास्याचा आनंद लुटत नवी मुंबईकरांना दीपावलीच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिल्या. प्रारंभी ‘नवी मुंबई प्रेस क्लब'चे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.

नवी मुंबईतील ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिक, समाजसेवक, कवितेवर प्रेम करणारे रसिक यांना ‘नवी मुंबई प्रेस क्लब'ने दीपावलीची सदर खास भेट दिली. यावेळी उपस्थितांना दुग्धपान व अल्पोपहाराचे कार्यक्रमाची सांगता झाली. दीपावली निमित्त ‘नवी मुंबई प्रेस क्लब'ने अविस्मरणीय संध्या दिल्याबद्दल रसिकांनी मनमुराद दात देत धन्यवाद दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंबिवलीकर तरुणाईने साजरी केली दिवाळी पहाट