दुवकल जेरबंद; २ पिस्तुल, ४ जिवंत काडतुस जप्त
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आणि फरार आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थ, मद्याची विक्री-सेवन करणारे, बेकायदा हत्यार बाळगणारे गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २९ ऑवटोबर रोजी कामोठे आणि तुर्भे या ठिकाणी कारवाई करुन बेकायदेशीर पिस्तुल आणि काडतुस विक्रीसाठी आलेल्या दोघांची धरपकड केली आहे. गुन्हे शाखेने या दोघांकडून २ पिस्तुल आणि ४ काडतुस जप्त करुन त्यांना अटक केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच समाजकंटकावर आणि गुन्हेगारांवर वचक राहून विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थ तसेच अवैध दारुची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने २९ ऑवटोबर रोजी सकाळी कामोठे येथील जवाहर इंडस्ट्रीयल भागात पिस्तुल घेऊन आलेल्या विवेक हरिविलास गिरी (२६) याला सापळा लावून ताब्यात घेतले. यावेळी गुन्हे शाखेने त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि २ राऊंड (काडतुस) सापडले. त्यानंतर गुन्हे शाखेने या आरोपी विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या कारवाई प्रमाणेच गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सुध्दा २९ ऑवटोबर रोजी रात्री तुर्भे उड्डाणपुलाखाली देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन आलेल्या नितीन अशोक कांबळे (३४) याला सापळा लावून पकडण्याची कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) आणि २ जिवंत काडतुस सापडले. गुन्हे शाखेने या आरोपी विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याच्याजवळ सापडलेले पिस्तुल आणि काडतुस जप्त केले आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.