महायुती मधील बंडखोरीला आशीर्वाद कुणाचा?

वाशी : महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष एकत्रीत  विधानसभा निवडणूक-२०२४ लढत आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्याने दोन्ही बाजूला बंडखोरी उफाळून आली असून, यात नवी मुंबई देखील वाचली नाही. नवी मुंबई शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवारांविरोधात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. त्यामुळे महायुती मधील बंडखोरीला वरिष्ठ पातळीवरुन छुपा पाठिंबा आहे का?, अशी चर्चा नवी मुंबई शहरातील राजकीय वतर्ुळात रंगू लागली आहे.

२०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युतीद्वारे एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्याने युतीतील सर्व नेत्यांनी युती धर्म पाळत ऐरोली मधून आ. गणेश नाईक यांना तर बेलापूर मधून सौ. मंदाताई म्हात्रे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यातील सत्तेची समिकरणे पालटली. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकलाप्रमाणे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. आता देखील महायुती एकत्रच लढत असून, जोडीला अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीप्रमाणे २०२४ मध्ये देखील महायुती तर्फे नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजप लढवत असून, गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार पुन्हा रिंगणात आहेत. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यांनीच अपक्ष अर्ज भरुन दोन्ही भाजप उमेदवारांना आव्हान दिले आहे. ऐरोली  विधानसभा मतदारसंघात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी अपक्ष अर्ज भरुन आव्हान दिले आहे. त्यामुळे महायुतीतील या बंडखोरीला वरिष्ठ पातळीवरुनच छुपा आशिर्वाद आहे का?, असा प्रश्न नवी मुंबई मधील महायुतीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लवकरच सरकते जिने