दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत नमुंमपा आयुक्तांची दिवाळी साजरी
नवी मुंबई : सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सक्षम करणारे केंद्र म्हणून नवी मुंबई महापालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्र संपूर्ण देशभरात नावाजले जात असून या ईटीसी केंद्राला भेट देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तेथील दिव्यांग विद्यार्थी आणि व्यक्तींसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अत्यंत समाधान देणारा असल्याचे आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, ईटीसी केंद्र संचालक तथा उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे तसेच केंद्राच्या प्रमुख, विशेष शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थी-व्यक्तींना फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद साधतांना आयुक्तांनी दिव्यांगांना मदतीचा हात देत सक्षम करण्याची जबाबदारी प्रशासन, विशेष शिक्षक आणि पालक अशी सर्वांचीच असल्याचे सांगत एकत्र येऊन अधिक चांगले कल्याणकारी काम जबाबदारीने करुया, अशी सादही घातली.
दिव्यांग मुलांचे पालक देखील विशेष शिक्षक असल्याचे नमूंद करीत आयुक्तांनी ईटीसी केंद्रात मुलांसमवेत येणाऱ्या पालकांसाठीही विशेष उपक्रम राबवावेत. तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असून दिव्यांगांसाठीच्या अद्ययावत उपचार पध्दतींचा समावेश ईटीसी केंद्रात करावा, असेही आयुक्त डॉ. शिंदे यांनी सूचित केले.
ईटीसी केंद्रातील विविध शैक्षणिक कक्षांना आणि वर्गांना भेट देत आयुक्त डॉ. शिंदे यांनी तेथील विशेष शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासावर लहानपणापासूनच भर देण्याची सूचना करीत त्यादृष्टीने नियमित शिक्षणासोबतच विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
यावेळी उपस्थित पालकांपैकी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना ईटीसी केंद्रामुळे त्यांच्या पाल्यांच्या जीवनात घडलेल्या आमुलाग्र बदलाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी अनेक पालकांना बोलताना आनंदाश्रू अनावर झाले.
ईटीसी केंद्रातील वेगवेगळ्या उपचार पध्दतींचा मुलांच्या वर्तनावर होणारा सकारत्मक परिणाम पालकांनी अत्मियतेने सांगितला. आयुक्तांनी दिव्यांग मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा राबविलेला उपक्रम दिलासा देणारा असल्याचे पालकांनी सांगितले.