नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद -आ. मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजताच संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने १५१-बेलापूर विधानसभा क्षेत्रात सीबीडी येथील वारकरी भवनमध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा ‘कार्यकर्ता मेळावा' संपन्न झाला.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सीबीडी मधील गेल्या २५ वर्षापासूनचे जुने कार्यकर्ते असून ते आजपर्यंत माझ्या सोबतच आहेत. त्यामुळे माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. तसेच भाजपा सह ‘महायुती'मधील मित्रपक्ष कायमच विकासाचा मुद्दा घेऊनच राजकारणात काम करत आहे. त्यामुळे आम्ही विकास कामावरच बोलणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील बेलापूर ते वाशी पर्यंत या विभागामध्ये माझ्या आमदार निधीमधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत सुमारे २००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन गाव-गांवठाणांसह इतर विभागाचा कायापालट करत नवी मुंबईचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये झालेला विकास जनतेच्या डोळ्यासमोर उभा आहे, असे आमदार सौ. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
सदर मेळाव्यास अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, उत्तर प्रदेश प्रकोष्ठ राजाराम सिंग, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाल गायकवाड, कमल शर्मा, प्रभाकर कांबळे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर, दामोदर पिल्ले, हस्तीमल जैन, मनोहर बाविस्कर, विजय शेट्टी, मेनन, बलबीर चौधरी, आरती राऊळ यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बेलापूर विधानसभा मतदारसंघातून ‘महायुती'च्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे या मोठ्या मताधिववयाने विजयी होऊन आमदारकीची हॅटट्रिक साधतील, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी व्यवत केला.