या खुर्चीसाठी चाललंय काय?

‘अ-राजकीय हास्य संध्या'मध्ये रंगणार कविता, गप्पांचा फड

नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या ‘दीपोत्सव'च्या अनुषंगाने ‘नवी मुंबई प्रेस क्लब'च्या वतीने ‘या खुर्चीसाठी चाललंय काय?' या विडंबन तसेच हास्य कविता आणि रंजक गप्पांद्वारे राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणाऱ्या ‘अ-राजकीय हास्य संध्या'चे आयोजन आज २९ ऑक्टोबर रोजी वाशी मध्ये करण्यात आले आहे.  

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला आगळा रंग चढू लागला असताना मतदार राजाला कोेजागर्ति अर्थात कोण जागे आहे? असे विचारुन जागे करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकत्याच साजऱ्या झालेल्या कोजागरी पोर्णिमा आणि ‘दीपावली'चे औचित्य साधत ‘नवी मुंबई प्रेस क्लब'ने ‘या खुर्चीसाठी चाललंय काय?' या ‘अ-राजकीय हास्य संध्या'चे आयोजन केले आहे.  

आज २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न होणाऱ्या या ‘हास्य संध्या'मध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महेश केळुसकर, मिर्झा बेग (अमरावती) यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक श्रीकांत बोजेवार आणि ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. हास्य कविता आणि रंजक गप्पांद्वारे राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य होणाऱ्या या नर्मविनोदी ‘हास्य स्ध्या'चा आस्वाद घेण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘नवी मुंबई प्रेस क्लब'द्वारे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भव्य ‘अभिजात मराठी अक्षर रांगोळी'द्वारे दीपोत्सव