नवी मुंबईत प्रभावी माध्यमांद्वारे मतदार जनजागृती

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार जनजागृती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यानुसार बेलापूर विभागात सेक्टर-११ रेल्वे स्टेशन परिसर तसेच बेलापूर गांव आणि शहाबाज गांव परिसरात स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहयोगाने जनजागृती रॅली काढून मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून तेथील नागरिक समुहांसोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आल्या.

अशाच प्रकारे वाशी विभाग कार्यक्षेत्रात वाशी रेल्वे स्टेशन तसेच वाशीगांव आणि परिसरात नागरिक समुहांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सेक्टर-९ ए मधील भाजी मार्केट आणि मोतीमाला ज्वेलर्स परिसरातील व्यावसायिक आणि ग्राहकांशी संवाद साधून त्यांनाही २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. तसेच सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेण्यात आल्या.

मतदानाबाबत तरुणाईच्या मनात असलेली उत्सुकता लक्षात घेत नेरुळ, सेक्टर-१९ए येथील स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात युवकांशी संवाद साधत त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदार प्रतिज्ञाही घेण्यात आली.

मतदानाचा अधिकार मुलांना नसला तरी ते उद्याचे जागरुक नागरिक असल्याचे लक्षात घेत त्यांच्या मनात आत्तापासूनच मतदानाचे लोकशाहीतील महत्व रूजविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दिघा ईश्वरनगर येथील संजीवनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली मोठ्या संख्येने सहभागी विद्यार्थ्यांनी यशस्वी केली. मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत, घोषणा देत त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेत २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. अशाचप्रकारे ऐरोली, सेक्टर-४ ऐरोली येथील श्रीम. सुशिलादेवी देशमुख विद्यालयाच्या एनएसएस पथकानेही ऐरोली परिसरात रॅली द्वारे जोरदार जनजागृती केली.

नेरुळ विभाग कार्यालय क्षेत्रात ‘मतदारराजा जागा हो' या पथनाट्याचे प्रयोग करीत मनोरंजनातून मतदानाचा अधिकार कर्तव्यभावनेने बजावण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.

नवी मुंबई महापालिका हद्दीतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन्ही विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक प्रमाणात जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत नमुंमपा क्षेत्रातील दोन्ही विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यामध्ये विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी सागर मोरे (बेलापूर) आणि अभिलाषा म्हात्रे-पाटील (ऐरोली) आणि त्यांचे सहकारी मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव आणि मुख्याध्यापक, शिक्षकांचेही सहकार्य आहे.

शाळा, महाविद्यालयांतून विविध उपक्रमांद्वारे जनजागृती...
शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून २६ ऑवटोबर रोजी ऐरोली डीएव्ही पब्लिक स्कुल, श्रीराम विद्यालय, सुशीलादेवी देशमुख विद्यालय-महाविद्यालय, दिघा मधील संजीवन विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने एकत्र येत रॅलीद्वारे जनजागृती केली. तसेच मतदानाची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. सुशीलादेवी देशमुख विद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांनी परिसरात मतदार जनजागृती रॅली काढली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध, पोस्टर, रांगोळी स्पर्धेला उत्साही सहभाग लाभला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत मनोरंजनाद्वारे जागरुकता निर्माण केली.

नमुंमपा शाळा क्र-४२ घणसोली येथील विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान जागृतीचे फलक तयार करून फलक उंचावत, घोषणा देत शिक्षकांसह शाळा परिसरात रॅली काढून लोकांना मतदान करण्याचा संदेश दिला. शाळा क्र.१८ सेक्टर-५, सानपाडा येथे पालकांनी मतदार जनजागृतीपर रांगोळी काढून जागरुक नागरिकत्वाचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली. घणसोलीतील शेतकरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांनीही रॅलीद्वारे तरुणाईने मतदान करावे, असा संदेश घोषणा आणि फलकांद्वारे प्रसारित केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राजकीय पक्षांनी पाठ फिरविल्याने कंदील बनविणाऱ्या कारागिरांवर मंदीचे सावट