सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती महत्त्वाची
१९३० या शासकीय संपर्क क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन
डोंबिवली : डोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण सभा कार्यालयात सायबर गुन्ह्यांविषयी माहिती आणि जनजागृती करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत आलेल्या विविध अनुभवांच्या आधारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. कदम यांनी सध्या सुरु असलेल्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि पध्दती सांगितल्या. तसेच पोलीस यंत्रणाद्वारे कशाप्रकारे सायबर गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येते, ते देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर १९३० असा शासकीय हेल्पलाईन नंबर सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यापासून पुढची सगळी मदत मिळवून देतो, असेही कदम यांनी सांगितले.
टेलीग्राम किंवा इतर माध्यमांतून आलेल्या ए.पी.के. फाईल डाऊनलोड करु नये आणि फोनमध्ये अशा फाईल्स ठेवल्यास हॅकरला फोनमधील डेटा मिळतोच; पण आपल्या फोनचा ताबाही मिळतो, अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. के.वाय.सी., शेअर्स, बँक, आदि नावाने येणारे फोन उचलू नये आणि आपली खाजगी माहिती जसे की ओटीपी, जन्मतारीख, आधार क्रमांक कुठेही प्रसारित करु नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी केले.
मंडळाने आणि बँकेने आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमा बद्दल दोन्ही संस्थांचे आभार मानत, सदर कार्यक्रमाप्रमाणेच जनजागृती करिता अशा विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक'चे संचालक आणि आयटी क्षेत्रातील तज्ञ योगेश वाळुंजकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सायबर सुरक्षाचे विविध पैलू उलगडले.
यामध्ये त्यांनी फिशींग, हॅकिंग, फोनकॉलवरुन होणारे विशींग, पासवर्ड फ्रॉड असे सायबर गुन्ह्यांचे प्रकार समजावून देत आपण स्वतः काळजी कशी घेऊ शकतो, असे स्पष्ट केले. जगात फक्त १०-१२ देशांमधे आर्थिक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी ओटीपीची सुविधा असून भारत त्यापैकी एक आहे, असेही त्यांनी नमूद केले. पासवर्ड कसा ठेवावा, म्हणजे हॅक करणे कठीण होईल, याबद्दल उत्तम मार्गदर्शन वाळुंजकर यांनी केले. साधारण १०-१५ कॅरेक्टरचा अल्फान्यूमरीक पासवर्ड, वेगवेगळ्या अकाऊंटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवणे तसेच अनावश्यक ठिकाणी पर्यायी मोबाईल नंबर आणि पर्यायी ईमेल आयडी देणे अशा उपायांमुळे ह्या गुन्ह्यांपासून काही प्रमाणात धोका कमी होतो असेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी, तिथे आपली कोणती माहिती किती प्रमाणात व कशी द्यावी, याबद्दलही मार्गदर्शन केले. सोशल मिडीयावर होणारे सेक्स्टॉर्शन, लोकेशनचा चुकीचा वापर याबद्दल महत्त्वाची माहिती वाळुंजकर यांनी दिली. सायबर विमा याबद्दल मार्गदर्शन करीत प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन वाळुंजकर यांनी केले.
मंडळाचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन्ही मान्यवर वक्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच अशाप्रकारचे जनजागृती करिताचे विविध कार्यक्रम भविष्यात देखील आयोजित करण्याचा मानस असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेसोबत सदर उपक्रमाचे आयोजन करून सध्याच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करण्याचा उपक्रम करता आला. या बद्दल बँकेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे आभार मंडळाचे सहकार्यवाह केदार पाध्ये यांनी मानले.