पशु डॉक्टरांकडून खारघर शहरात मोकाट श्वानांचे रेबीज लसीकरण

खारघर : खारघर मधील पशु वैद्यकीय तज्ञांकडून रेबीज मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे रेबीज लसीकरण केले जात असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघर मधील जवळपास दिडशे मोकाट कुत्र्यांना रेबीजची लस देण्यात आली असून यापुढेही सदर मोहीम राबविली जाणार आहे.

खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांंचा वावर आहे. मागील वर्षी मोकाट कुत्र्यांनी वाटसरु तसेच लहान मुलांना चावा घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. दरम्यान, रेबीज एक टाळता येण्याजोगा विषाणूजन्य आजार आहे. रेबीज आजार पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात कुत्र्यांना होतो. त्यामुळे रेबीज लसीकरण सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रेबीजची लस भटक्या व्यक्तींना संसर्ग होऊन वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे खारघर मधील पशुप्रेमी सीमा टांक यांनी खारघर मध्ये विविध पशु डॉक्टरांच्या सहकार्याने मोकाट कुत्रे पकडून त्यांच्या रेबीज लसीकरणाची मोहीम सुरु केली आहे.

या मोहिमेत खारघर परिसरातील दीडशे कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेसाठी डॉ. अमित पाटील, डॉ. निकिता मस्तकर, डॉ. कृती पाचपिंडे, पुजा हिरुळकर तसेच स्वयंसेवक रमेश बाविस्कर रिसाल सय्यद सहभागी झाले होते.

खारघर मधील पशुप्रेमींकडून गेल्या ७ वर्षांपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेत खारघर मधील पशु डॉक्टर सहभागी झाल्यामुळे  मोहिमेला बळ मिळाले आहे.
-सीमा टांक, पशु प्रेमी.

खारघर शहर रेबीज मुक्त करण्याचा संकल्प आम्ही पशु डॉक्टरांनी केला आहे. पहिल्या मोहिमेत १५० मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. दर रविवारी मोहीम राबवून खारघर रेबीज मुक्त करण्याचा संकल्प आहे.
- डॉ. अमित पाटील, पशु डॉक्टर, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एक हजार पोस्ट कार्डवरील पत्रातून दिला मतदान जनजागृतीचा अनमोल संदेश