नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
पनवेल मध्ये ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी' मोहीम
पनवेल : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी' सखोल स्वच्छता मोहिमेला चारही प्रभागांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार चारही प्रभागांमध्ये या मोहिमेसाठी विशेष १५० सफाई कर्मचाऱ्यांचे पथक बनविण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी सुरु झालेली सदर मोहिम २९ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
२४ ऑक्टोबर रोजी चारही प्रभागातील मुख्य बाजारपेठ आणि आठवडे बाजार भरणाऱ्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. तसेच भाजी विक्रेत्यांना २ डस्टबीन देण्यात आले. तसेच बाजरपेठ आणि भाजी आणि फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिकबंदी विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच २५ ऑक्टोबर रोजी स्वच्छ उद्यान अभियान अंतर्गत चारही प्रभागातील सार्वजनिक उद्याने, बागा आणि खेळाच्या मैदानांची संपूर्ण सफाई, उद्याने, गार्डन आणि खेळाच्या मैदानाच्या परिसरातील अथवा प्रवेश रस्त्यावरील डेब्रिज उचलण्यात आले.
दिवाळीपूर्वी घरोघरी साफसफाई केली जाते. यावेळी अडगळीतील परंतु सुस्थितीतील कपडे, चप्पल, बुट, पुस्तके, स्कुलबॅग आदि वस्तू कचऱ्यात फेकण्यात येतात. अशा सुस्थितीतील वस्तू थ्री-आर (रिसायकल, रियुझ, रिड्युस) केंद्रामध्ये जमा करण्याबाबत नागरिकांना उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी आवाहन केले आहे.
आज २६ ऑक्टोबर रोजी चारही प्रभागातील मोकळे खाजगी किंवा महापालिकेचे प्लॉट, नदी किंवा नाला, पुलाशेजारी, जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये अशा मोठ्या प्रमाणात कचरा साठलेल्या ठिकाणांची जेसीबीद्वारे आणि मनुष्यबळाद्वारे संपूर्ण स्वच्छता करुन घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित ठिकाणी नागरिकांनी पुन्हा कचरा फेकू नये याकरिता बॅनर लावण्यात येणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी स्वच्छ आणि एकल वापर प्लास्टिक मुक्त व्यावसायिक क्षेत्र अभियान अंतर्गत चारही प्रभागातील व्यापारी क्षेत्रांमध्ये व्यापारी आस्थापनांना २ डस्टबिन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर व्यापारी क्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदी नोटिसांचे दुकानदारांना वाटप करण्यात येत आहेत. एकल वापर प्लास्टिक दंडात्मक आणि जप्ती कारवाई करण्यात येणार आहे.
२८ ऑक्टोबर रोजी रस्ते दुभाजक आणि फुटपाथची सखोल स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. यामध्ये चारही प्रभागातील मुख्य चौक, मुख्य रस्ते आणि महामार्ग यांचे दुभाजक मधील आणि फुटपाथ वरील गवत काढणे, दुभाजक आणि फुटपाथ वर जमा झालेली माती काढणे, फुटपाथवर पडलेले डेब्रीज जेसीबीद्वारे उचलण्यात येणार आहे. तर २९ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी' सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत चारही प्रभागांमधील मुख्य चौक, महामार्ग, प्रमुख रस्ते यांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच चारही प्रभागातील मुख्य चौक मधील शिल्प, पुतळे, महामार्ग आणि मुख्य रस्त्यांचे फूटपाथ स्प्रे जेटींग मशीनद्वारे स्वच्छ करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी' सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत आज तळोजा मध्ये एकल प्लास्टिक बंदी कारवाई करण्यात आली. यावेळी ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.