निवडणुकीच्या रणधुमाळीत शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
कल्याण : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांपासून ते प्रशासकीय यंत्रणा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कामाला लागले आहेत. असे असताना या निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र शहर स्वच्छतेकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत असून कल्याण पश्चिम मधील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत शिवसेना उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी ‘केडीएमसी'चा नियोजन शून्य कारभार असल्याचा आरोप करत वेळच्यावेळी सर्व प्रभागातील कचरा उचलण्याची मागणी केली आहे.
कल्याण पश्चिम मधील गोल्डन पार्क, न्यू मनिषानगर, दुर्गानगर ठाणकरपाडा, बेतूरकर पाडा याठिकाणी कचरा पडलेला असतो. आधी याठिकाणी कचरा कुंड्या होत्या; मात्र महापालिकेने येथील कचरा कुंड्या हटवून घंटागाड्या सुरु केल्या. मात्र, नागरिक याठिकाणी कचरा टाकत असून सदरचा कचरा उचलण्यात महापालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे. याठिकाणी पडलेला कचरा घंटागाडीच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. मात्र, याठिकाणी गाडी रिकामी करण्यास वेळ लागत असल्याने एक घंटागाडी रिकामी करुन पुन्हा कचरा उचलण्यासाठी एक ते दिड तास जातो.
शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरत आहेत. सध्या सर्वजण विधानसभा निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने जे सामान्य लोक कचऱ्यासाठी ६५० रुपये अधिभार भरत आहेत, त्या लोकांनी करायचे काय? असा सवाल शिवसेना उपशहरप्रमुख मोहन उगले यांनी उपस्थित केला आहे.