‘२७ गांव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समिती' अध्यक्षपदी खा. सुरेश म्हात्रे यांची निवड

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ‘२७ गांव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समिती'चे पूर्वीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी ‘संघटना'च्या सर्व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर इतर सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून ‘भिवंडी'चे खासदार सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांची नव्याने अध्यक्षपदी निवड केली असल्याचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर २७ गावातील स्वतंत्र नगरपालिकासह अनेक समस्या सुटाव्यात याकरिता आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

२३ ऑक्टोबर रोजी दुपारी ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'चे नेते डॉ. वंडार  पाटील यांच्या कार्यालयात ‘सर्वपक्षीय संघर्ष समिती'च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जमून खासदार सुरेश म्हात्रे यांची कल्याण ग्रामीण मधील ‘२७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती'च्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली. त्यामुळे ‘महायुती'ला ‘महाविकास आघाडी'ने जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी वंडार पाटील, सत्यवान म्हात्रे, विजय भाने, रामदास काळण, दत्ता वझे, तुळशीराम काळण, वासुदेव संते, वासुदेव गायकर, शरद म्हात्रे, राम पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण ग्रामीणमध्ये २७ गावांची सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे. सदर समिती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या ‘समिती'ने गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी लढा दिला होता. २००२ साली गावे महापालिकेतून वगळण्यात आली. त्यानंतर पुन्हा सदर गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली. गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास ‘समिती'चा विरोध होता. या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी होती. २७ पैकी १८ गावे वगळून त्याची नगरपालिका करण्याचा निर्णय तत्कालीन ‘महाविकास आघाडी सरकार'ने घेतला. सध्या सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

विद्यमान मुख्यमंत्री आणि खासदारांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, ते निर्णय राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, आत्ता ‘सर्वपक्षीय संघर्ष समिती'च्या अध्यक्षपदी खा. सुरेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली. नवे अध्यक्ष ‘संघर्ष समिती'चे प्रश्न सोडवितील, अशी आशा आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून ‘समिती'मध्ये मतभेद असल्याचे चर्चा आहे. ‘समिती'चे पदाधिकारी गुलाब वझे आणि काही पदाधिकाऱ्यांची खासदार शिंदे यांच्याशी जवळीक आहे. यातील काही सदस्य अन्य पक्षाचे आहे. त्यामुळे स्थानिक सध्याला राजकारणाला कंटाळून सदरचे पाऊल उचलले आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ‘२७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती'च्या मार्फत २७ गांवचे रखडलेले विषय आणि तसेच गावांचा व्यवस्थित विकास व्हावा यासाठी वेगळी नगरपालिका असावी, अशी येथील सर्व नागरिकांची मागणी आहे. जर स्थानिकांची मागणी असेल तर नक्कीच शासनाने या मागणीचा विचार करायला हवा. स्वतंत्र महापालिका किंवा नगरपालिकेची निर्मिती करावी, अशी मागणी ‘संघर्ष समिती'च्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत. सदर सर्व ग्रामस्थांचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला मागून मिळत नसेल तर त्यासाठी लढा देखील उभारला जाईल. संघर्षातून नवीन महापालिका अस्तित्वात येईल, असा विश्वास खासदार म्हात्रे यांनी सदर निवडीनंतर व्यक्त केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निवडणुकीच्या रणधुमाळीत शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष