सानपाडा येथील एसटी संगणकीय आरक्षण, निवारा केंद्र बंद

राज्याचे आणि सामान्य जनतेचे देखील मोठे आर्थिक नुकसान

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा येथील बंद असलेले एसटी संगणकीय आरक्षण केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांनी  ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ'चे (एसटी) व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील वाढती प्रवाशांची संख्या पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ तर्फे नागरिक आणि प्रवाशांच्या सोयी करता एसटी संगणकीय आरक्षण केंद्र आणि प्रवाशी निवारा  शेड यांची उभारणी सानपाडा येथील उड्डाणपूल शेजारी करण्यात आली आहे. परंतु, गेली कित्येक महिने सदर संगणकीय आरक्षण केंद्र आणि निवारा शेड नागरिकांच्या सेवेत आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा, सुरक्षित प्रवास या सेवा वितरण करण्यात कमतरता आढळून आली आहे. सध्या काही दिवसात दिवाळी सण सुरु होणार असून, दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक एसटी बसचा वापर करीत असतात. परंतु, नवी मुंबई मधील सानपाडा येथे नागरिकांच्या सोयी करता उभारण्यात आलेले एसटी संगणकीय आरक्षण केंद्र सणासुधीच्या कालावधीमध्ये बंद स्वरुपात असल्यामुळे नागरिकांसोबतच राज्य परिवहन खात्याचे देखील मोठे नुकसान होत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे निलेश कचरे यांनी निवेदनात निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, वरिष्ठ या नात्याने आपण सानपाडा येथील बंद स्वरुपात असलेले संगणकीय आरक्षण केंद्र आणि निवारा केंद्र त्वरित नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती देखील 'एसटी'च्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या निवेदनात निलेश कचरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे सर्वसामान्य जनता खाजगी बस वाहतूक आणि खाजगी प्रवास यंत्रणा यांचा पर्याय अवलंबत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आणि सामान्य जनतेचे देखील मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे अधोरेखित होत आहे. - निलेश सोमाजी कचरे, सामाजिक कार्यकर्ते - सानपाडा, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगरी-कोळी संस्कृती भवनाचा वापर शासकीय कार्यक्रमांसाठी न करण्याची मागणी