नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनधिकृत जाहिराती, बॅनर्स, होर्डींग्जवर कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी विविध माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये 13 ते 16 ऑक्टोबर या 4 दिवसांच्या कालावधीत 4418 इतक्या मोठया संख्येने छोटे-मोठे अनधिकृत बॅनर्स व होर्डींग हटविण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सदर मोहीम आठही विभाग कार्यालय स्तरावर युध्दपातळीवर राबविण्यात आलेली असून संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून शासकीय, सार्वजनिक व खाजगी अशा तिन्ही मालमत्तांवर तसेच जागांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये बेलापूर विभागात 391, नेरुळ विभागात 1139, वाशी विभागात 444, तुर्भे विभागात 1005, कोपरखैरणे विभागात 571, घणसोली विभागात 350, ऐरोली विभागात 331, दिघा विभागात 187 अशा प्रकारे एकूण 4418 छोटे -मोठे बॅनर्स व होर्डींग स्वरुपातील अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक भिंतींवरील चित्रे, लेखन, पोस्टर्स, पेपर्स, झेंडे, कमानी देखील हटविण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना विनापरवानगी अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून यापुढील काळात निवडणूक विभागाची रितसर परवानगी घेऊनच परवानगी दिलेल्या ठिकाणी मान्यता मिळालेल्या आकारात जाहिराती प्रसिध्द कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वर्षोनुवर्षे एकाच विभागात कार्यरत ५४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या