‘टीम आप'तर्फे ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा
नवी मुंबई : देशभरातील पारंपरिक राजकारणाने गाठलेल्या मतलबी, भ्रष्टाचारी आणी हुकूमशाही वृत्तीच्या पार्शवभूमीवर, ‘आम आदमी पार्टी'च्या रुपाने शून्य भ्रष्टाचार आधारित उत्कृष्ट जनताभिमुख कामासाठी सक्षम पर्याय उभा राहत आहे. त्याला महाराष्ट्र सुध्दा अपवाद नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी, सुशिक्षित आणि सुसंकृत विचारसरणीची जनता येथील पारंपरिक राजकारणाला विटलेली असून, पर्याय शोधत आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी हाच भक्कम पर्याय आहे, असे ‘आप'च्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ‘आप'कडून महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा जागांवर सक्षमपणे लढण्याची तयारी सुरु करण्यात आली. त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हा कमिटी तर्फे ठाणे जिल्हा अध्यक्ष मुरारीलाल पचोरी, उपाध्यक्ष सतीश सलुजा, सचिव दुरिया तसेच मुख्य नेते डॉ. फैझी यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑक्टबर रोजी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या तयारीचा आढावा घेऊन, प्रत्येकी २ प्रतिनिधींची नावे निवडणूक प्रतिनिधी म्हणून देण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार ‘आप'चे राज्य सहसचिव श्यामभाऊ कदम यांनी १३ ऑक्टोबर रोजी कोपरखैरणे मधील जनसंपर्क कार्यालयात, नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काही ठराव सर्वानुमते संमत करुन घेतले. यामध्येे मुख्यतः प्रत्येक वॉर्ड अध्यक्षाला बुथ टिम बनविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच १५०-ऐरोली विधानसभा क्षेत्रासाठी प्रीती शिंदेकर आणि डॉ. मिलिंद तांबे तर १५१-बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी सुधीर पांडे आणी श्यामभाऊ कदम यांची नावे निवडणूक प्रतिनिधी म्हणून ठाणे जिल्हा कमिटीला देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच नवी मुंबईतील १७ इच्छुक उमेदवारांमधून फक्त निष्ठावान, सर्वात जाणकार आणि ज्येष्ठ तसेच निवडणूक लढविण्यास सक्षम असलेल्या कार्यकर्त्याचीच निवड करावी, असा ठराव देखील यावेळीी एकमताने संमत करण्यात आला.