महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा
नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ‘केंद्रीय निवडणूक आयोग'तर्फे झारखंड सह महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहिर केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १५ ऑवटोबर रोजी पत्रकार परिषद मध्ये केली. ‘केंद्रीय निवडणूक आयोग'ने जाहिर केल्यानुसार महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मजमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, राज्यात आचारसंहिता देखील लागू झाल्याचे मुख्य निवडणूकआयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभाची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी आधी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ‘केंद्रीय निवडणूक आयोग'कडून महाराष्ट्र सोबतच झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची १५ ऑवटोबर रोजी घोषणा करण्यात आली आहे. ‘निवडणूक आयोग'ने निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रात मागच्या दोन विधानसभा निवडणुका (२०१४ आणि २०१९) एकाच टप्प्यात घेण्यात अअल्या होत्या. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले होते. तर २०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
महाराष्ट्रातील मतदारसंघ, मतदार, मतदान केंद्रांची माहिती...
महाराष्ट्रात एकूण मतदारसंघ २८८ असून त्यातील सर्वसाधारण मतदारसंघांची संख्या २३४ इतकी आहे. २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत. यामध्ये ४.९५ कोटी पुरुष मतदार तर ४.४६ कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ तर दिव्यांग मतदारांची संख्या ६.३२ लाख इतकी आहे.
८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२.४८ लाख आहे. तर १०० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ४९,०३४ इतकी आहे. १८-१९ वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या २०.९३ लाख इतकी आहे. महाराष्ट्र मध्ये १ लाख १८६ मतदान केंद्र (पोलींग स्टेशन) असणार आहेत. यामध्ये शहरात ४२,६०४ पोलींग स्टेशन तर ग्रामीण भागात ५७,५८२ पोलींग स्टेशन असतील.
मतदान करण्यासाठी केंद्रावर जाऊ न शकणारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना ‘निवडणूक आयोग'च्या वतीने घरातूनच मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी ‘निवडणूक आयोग'चे प्रयत्न राहाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग केले जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती ‘निवडणूक आयोग'ला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटप यावर ‘आयोग'कडून कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र किमान २ किलोमीटरच्या आत असावेत, अशा सूचना ‘निवडणूक आयोग'कडून संबंधितांना करण्यात आल्या असल्याचे आयुवत राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.
‘वोटर हेल्पलाईन ॲप'मध्ये मतदार आपले नाव तपासू शकतील...
‘वोटर हेल्पलाईन ॲप'मध्ये मतदार आपले नाव तपासू शकतील. मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती जाणून घेऊ शकतील आणि e-EPIC डाऊनलोड करु शकतील. सी-व्हिजील ॲप'द्वारे कोणत्याही गैरप्रकाराबाबत ‘निवडणूक आयोग'कडे तक्रार करता येऊ शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाईल. KYC APP मध्ये उमेदवारांविरोधात दाखल गुन्ह्यांचा सगळा तपशील उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रात २० सीमावर्ती जिल्हे आहेत. ६ राज्यांच्या सीमा महाराष्ट्राशी संलग्न आहेत. यात कर्नाटक, गोवा, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि दादरा नगर हवेली यांच्या सीमा संलग्न आहेत.