‘मनसे'चे परिवर्तन आंदोलन
नवी मुंबई : शिक्षण, आरोग्य, रोजगार यासह नवी मुंबईला अनेक समस्यांनी वेढले आहे. या सर्व समस्यांवर एक विरोधी पक्ष म्हणून ‘मनसे'ने ठोस काम केले आहे. सदर सर्व समस्यांकडे नवी मुंबईकरांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परिवर्तन आंदोलन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महिला सफाई कामगारांतर्फे पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी जी केवळ खोटी आश्वासने दिली, त्याचा गाजरनामा परिवर्तन आंदोलनात प्रसिध्द करण्यात आला. या परिवर्तन आंदोलनात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हजारो नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, परिवर्तन आंदोलनावेळी गजानन काळे आणि इतर महाराष्ट्र सैनिकांनी रक्तदान केले. थॅलेसेमिया रुग्णांना तसेच इतर आजारासाठी रक्ताची कायम गरज असते. आरोग्य व्यवस्थेत रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे ‘मनसे'च्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. वाशी, ऐरोली सह मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ‘मनसे'ने मागील १३ वर्षांपासून जो लढा दिलेला आहे, त्या लढ्याला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. त्यामुळे गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाशी टोल नाक्यावर जाऊन वाहन चालकांना पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
सर्व सीबीएसई, आयसीएसई, खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करा. शाळांची फी वाढ नियंत्रणात आणा. नवी मुंबईतील एमआयडीसी आस्थापनांकडून महिला बचत गट गृहिणींच्या हाताला काम द्यावे. सर्व प्रकारच्या खाजगी हॉस्पिटलचे विविध उपचारांचे दरपत्रक निश्चित करुन रुग्णांची होणारी लूट थांबवा. नवी मुंबईतील प्रत्येक कंपनीत शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा. एलआयजीची कुटुंब विस्तारापोटी वाढीव बांधकाम केलेली घरे नियमित करा. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करा. प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्क्यांचा मोबदला तात्काळ द्या. तुर्भे येथे एसटी डेपोसाठी राखीव भूखंडावर तात्काळ एसटी डेपो उभारावा, अशा घोषणा देवून महाराष्ट्र सैनिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी वाशी मधील परिसर दणाणून सोडला. या आंदोलनावेळी गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चळवळीतील गाणी गाऊन उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
‘मनसे'च्या परिवर्तन आंदोलनात गजानन काळे यांच्यासोबत उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, रोजगार विभाग राज्य सरचिटणीस संजय लोणकर, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, महिला सेना उप शहरअध्यक्ष दीपाली ढवुळ, अनिता नायडू, शुभांगी बंदिछोडे, सोनिया धानके, शहर सचिव सायली कांबळे, शहर सह सचिव ॲड. ललिता शर्मा, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, श्याम ढमाले, अमोल आयवळे, योगेश शेटे, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, निखिल गावडे, रोहन पाटील, नितीन नाईक, विशाल चव्हाण, निलेश जाधव, गणेश भवर, महिला विभाग अध्यक्ष विद्या इनामदार, नंदा मोरे तसेच मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.