अंबरनाथ शिवसेना मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातीलच ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे माजी नगरसेवक ॲड. संदीप भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे भावी आमदार म्हणून बॅनर झळकवले आहेत. यामुळे डॉ. बालाजी किणीकर यांना आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याने आव्हान दिल्याचे चित्र आता समोर येत आहे.
महाराष्ट्र भरात विधानसभा निवडणुकीेचे पडघम आता वाजू लागले आहेत. राजकीय पक्ष आपापली दावेदारी आणि जागा निश्चिती करिता युध्दबळ वापरताहेत. अनेक जण पक्षातूनच बंडखोरी करण्याच्या मार्गावर किंवा पक्षातून प्रस्थापित उमेदवारांच्या बदल्यात स्वतःसाठी नवा पर्याय म्हणून पक्षश्रेष्ठींनी आपला विचार करावा, यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात १४० मधून गेले ३ टर्म ‘शिवसेना'चे डॉ. बालाजी किणीकर आरक्षित मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले असल्यामुळे त्यांची चौथ्यांदाही तिकीट निश्चिती होण्याच्या मार्गावर आहे.
अंबरनाथ मधील ‘शिवसेना'च्या राजकारणात अरविंद वाळेकर विरुध्द डॉ. बालाजी किणीकर या गटांमध्ये कायमच वर्चस्ववाद धुमसत असतो. अलिकडेच अरविंद वाळेकर यांनी बालाजी किणीकर यांच्या कार्यपध्दतीवर जाहीरपणे टीकाही करुन नापसंती दर्शवली. संदीप भराडे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून गेल्या ५ वर्षात घाडगे नगर या परिसरातून नगरसेवक होते.
संदीप भराडे२०१४ मध्ये अंबरनाथच्या घाडगे नगर, मेटल नगर प्रभागातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत. नगरसेवक काळात पाणीपुरवठा सभापती असताना त्यांनी नगरपालिका स्तरावर पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपण बहुतांशी प्रयत्न केला आहे. परंतु, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने मर्यादा होत्या. आमदारांनी अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळवली आहे. परंतु, अस्तित्वात आलेले फार कमी दिसत आहेत. शासनाकडे पाणी, वाहतुककोंडी, प्रदुषण, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाहिजे त्या ताकदीने शासनाकडे प्रश्न मांडले नसल्याची खंतही भराडे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
गेल्या १०-१५ वर्षात अंबरनाथचा पूर्वेकडील प्राईम लोकेशनचा चेहरा काहिसा बदलला असला तरी अंबरनाथ मधील चाळी, झोपड्या, आदिवासी पाडे, वाड्या येथील मूलभूत प्रश्न सोडवण्यात आमदार अपयशी ठरल्याने अंबरनाथला विकासाचा चेहरा न बदलल्याचा आरोपही भराडे यांनी केला आहे. आपण पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी स्थानिक पक्षश्रेष्ठींशी आणि कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचेही भराडे यांनी सांगितले.