ठाणे खाडी पुल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३ च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्‌घाटन तसेच रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील ७ खाडीपुलांच्या कामांचे भूमीपुजन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर रोजी वाशी येथे संपन्न झाले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'च्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड , सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, मुख्य अभियंता राजेश निघोट , मुख्य अभियंता एस. के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

ठाणे खाडी पुल क्र.३ च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस-रेडी सागरी महामार्गावरील धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या खाडी पुलांचे भूमीपुजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पुलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपुजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. 

राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास २ लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

‘एमएसआरडीसी'च्या माध्यमातून राज्यात ५ हजार कि.मी. लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही ६ ते ७ तासात पोहोचता येईल. पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या ‘कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस-वे'चे काम ‘एमएसआरडीसी'ने हाती घेतले आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या ५ तासात पार करता येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ठाणे खाडी पुल क्र.३ ची उत्तर वाहिनी सदर तीन पदरी पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास ना. दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी १४ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे.

प्रकल्पांची माहितीः सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३ प्रकल्पामधील कामाचा वाव (प्रत्येकी ३ मार्गिकांचे २ पुल बांधणे. (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण आणि मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर). प्रकल्पाची एकूण किंमत - ५५९ कोटी रुपये. पुलाची लांबी-३१८० मीटर (पोहोच रस्त्यासह). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद