ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कामासाठी निधी दिला आहे. ती कामे प्रत्यक्षात झालेली पाहून, त्यांची गुणवत्ता पाहून त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ ऑवटोबर रोजी आनंद योग कुटीर आणि हँगिंग गार्डन-रघुनाथ नगर, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण-किसननगर, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय-नळपाडा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (५ ठिकाणी), नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (६ ठिकाणी), मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन-हाजुरी, धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका-कशिश पार्क, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट-उपवन, ग्रीन यात्रेच्या मदतीने झालेले जेल तलाव पुनरुज्जीवन-सेंट्रल मैदान, ‘ओएनजीसी'कडून तलाव साफसफाईसाठी मिळालेल्या यांत्रिक बोटी-राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे संगीतमय कारंजे या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच रहेजा जवळील उद्यानाचे भूमीपुजनही करण्यात आले.

मुख्यमंत्री झाल्यावर आणि त्याआधी नगरविकास मंत्री असताना धोरणात बदल करुन कायद्यात सुधारणा करत योजनांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. योजनांचा फायदा नागरिकांना मिळावा यासाठी ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून ५ कोटी लोकांपर्यंत लाभ पोहोचवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आ. प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, परिशा सरनाईक, गुरुमुख सिंग, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा,  उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, उमेश बिरारी, आदि उपस्थित होते.

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या विस्तारामुळे आणखी ८० रुग्ण खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होतो आहे. अशा प्रकारचे कॅशलेस रुग्णालय प्रत्येक क्लस्टर प्रकल्पात असावे, असे निर्देश आपण आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन येथे ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा प्रोत्साहन भत्ता...
एनयूएचएम आणि क्षयरोग विभागामध्ये अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते. त्यांना वेतनही शासनाकडून देण्यात येते. सदर रक्कम कमी असल्याने त्यांना देय असलेल्या वेतनामध्ये १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता ठाणे महापालिका देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

२९ कुटुंबियांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात...
हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणात २००१ मध्ये विस्थापित झालेल्या २९ कुटुंबियांच्या जागेचे स्वप्न साकार होणार आहे. त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, सदनिका देणार असल्याची पत्रे प्रदान करण्यात आली.

विद्यार्थीनींना सायकल वाटप...
‘बेटी बचावो, बेटी पढाओ' योजना अंतर्गत स्टेट बँकेच्या सीएसआर फंडातून शाळा क्रमांक-९ आणि ६५ मधील विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या. त्याचे वाटपही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर शाळा क्र.१८ ला ५ लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे खाडी पुल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण