कळंबोली सेक्टर-१४ मधील विजेच्या लपंडावावर ‘महावितरण'चा उपाय

पनवेल : कळंबोली, सेक्टर-१४ येथे गेल्या काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरु होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे वीजेची समस्या उद्‌भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्यामुळे या परिसरामध्ये नव्याने वीज वाहिनी टाकून पिलर सुध्दा बसवण्यात आला आहे. परिणामी, आता हजारो वीज ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा केला जाणार आहे. येथील रहिवाशांनी यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

कळंबोली, सेक्टर-१४ येथे बीयुडीपीची घरे आहेत. या ठिकाणी अल्प आणि मध्यमवर्गीय लोक वास्तव्यास आहेत. दरम्यान, नियमित वीज बिल भरणा केला जात असतानाही या ठिकाणचा वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत होता. केबल फॉल्ट होणे, त्याचबरोबर स्पार्क आणि ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड या कारणाने रात्रीच्या वेळी तासन्‌तास बत्ती गुल होत होती. त्यातच नवरात्रौत्सवमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या माळेला पूर्णपणे अंधार झाला होता. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सदर परिसरात अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी आ. प्रशांत ठाकूर यांनी बैठक घेऊन यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावे, असे सूचित केले होते. सेक्टर-१४ येथील वीज प्रश्नावर कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील यांनी ‘महावितरण'ला पत्र दिले होते. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी सुध्दा ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

दरम्यान, या संदर्भात कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि कळंबोलीचे सहाय्यक अभियंता यांनी स्वतः गांभीर्याने लक्ष घालून सेक्टर-१४ येथील वीज वाहिनी बदलली आहे. अगोदर या ठिकाणी ७० केव्ही क्षमतेची केबल होती. एकूण विजेची मागणी पाहता त्याची क्षमता कमी असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सहाय्यक अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन सदर ठिकाणी ३०० केव्ही क्षमतेची वीज वाहिनी नव्याने टाकली. जवळपास १५० मीटर लांबीची केबल बदलण्यात आली. या कामाची राजेंद्र शर्मा यांनी स्वतः स्थळ पाहणी केली.

आ. प्रशांत ठाकूर आणि ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ‘महावितरण'ने या ठिकाणी उपाययोजना केल्या. आता या भागातील वीज ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा होईल, असा विश्वास ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्र. ७ मधील सेक्टर-१४ येथे विजेचा लपंडाव सुरु होता. येथील रहिवाशांच्या तक्रारी असल्याने आम्ही सातत्याने ‘महावितरण'कडे पाठपुरावा करत होतो. याबाबतीत स्वतः आ. प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले. पक्षाचे शहराध्यक्ष रवीनाथ पाटील आणि मी संबंधित कार्यालय तसेच अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. शेवटी या ठिकाणची केबल बदलण्यात आली असून त्याची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे. त्यामुळे केबल फॉल्ट होऊन वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे बत्ती गुल होण्याचा प्रश्न आणि समस्या जवळपास मार्गे निघेल.
-राजेंद्र शर्मा, माजी नगरसेवक, पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘काँग्रेस'तर्फे महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा