उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजारपेक्षा जास्त!

उरण : उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे मासिक वेतन यापुढे १० हजार  रुपये ऐवजी कायद्याने देय असलेले किमान वेतन १८ हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार आहे.

म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन तर्फे उरण नगरपरिषद मध्ये अनेक वर्षे असंघटीत असलेल्या अनुसूचित जाती, जमातीचे बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधी मिळावा, ईएसआयसी या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा, बोनस मिळावा, या मागण्यांसाठी ८ ऑक्टोबर २०२४ पासून कामबंद आणि १० ऑक्टोबर २०२४ पासून आमरण उपोषण आंदोलन ‘म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन'चे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव आणि कार्याध्यक्ष कामगार नेते संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु केले होते.

या आंदोलनाच्या अनुषंगाने १० ऑक्टोबर रोजी ‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या दालनात कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव आणि कामगार नेते संतोष पवार यांची कंत्राटदार देशमुख यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेऊन येत्या काळात म्हणजेच दोन दिवसांत नवीन टेंडर प्रसिध्द करुन सध्यस्थीतीत अनेक वर्षांपासून कार्यरत उरण नगरपरिषद मधील सर्व गोरगरीब पद्‌दलीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार तसेच कंत्राटी कामगारांना एप्रिल २०२४ पासून किमान वेतन, नियमाप्रमाणे ईपीएफ, ईएसआयसी आणि ८.३३ टक्के बोनस कंत्राटदाराने देणे बंधनकारक आहे अन्यथा सदरहू कंत्राटदाराची मागिल देयके आदा करणे शक्य होणार नाही, वेळ प्रसंगी कंत्राटदारावर कारवाई करावी लागेल, अशी भूमिका घेतल्यामुळे मे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीचे मालक देशमुख यांनी १९४८ मधील किमान वेतन कायद्यानुसार तसेच वेळोवेळी राज्य कामगार आयुक्त तथा संचालक यांच्या संचालनालयातर्फे वेळोवेळी र्निगमित झालेल्या शासन परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन करण्याचे मान्य केल्यामुळे ‘म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन'चे अध्यक्ष ॲड .सुरेश ठाकूर यांनी उरण नगरपरिषद मध्ये पुकारलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे उशीरा का होईना परंतू न्याय प्रस्थापित केल्याबद्दल अभिनंदन केले. या आंदोलनाची सांगता मुख्याधिकारी समीर जाधव यांनी कंत्राटी सफाई कामगारांना पाणी पाजून केली. त्यानंतर उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

यापुढे उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता मासिक वेतन रक्कम १० हजार रुपयांऐवजी १८ हजार रुपये मिळणार असून, मागील चार महिन्यांतील वाढीव पगार थकबाकीसह रक्कम लवकरच मिळणार आहे. यामुळे उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कामगार आनंदीत झाले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळंबोली सेक्टर-१४ मधील विजेच्या लपंडावावर ‘महावितरण'चा उपाय