टेक्नॉलॉजी क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल-उपमुख्यमंत्री फडणवीस

नवी मुंबई : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात टेक्नॉलॉजीयुक्त पोलिसींगमध्ये देखील महाराष्ट्राला अव्वल करण्याचा प्रयत्न करु, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापे येथे व्यक्त केला.  

नवी मुंबईतील महापे येथे अत्याधुनिक असे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्‌घाटन ११ ऑवटोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इकबाल चहल, पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) बिपीनकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ‘एमआयडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक पी. वेलारासू, अपर पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शित्रे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  

वाढत्या अर्थव्यवस्थेबरोबरच डिजीटायजेशनमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आव्हाने आणि सायबर क्राईमचा धोका तितक्याच प्रमाणात वाढत आहे. २०१७-१८ मध्ये सायबर गुह्यांच्या धोक्याचे आव्हान आम्ही ओळखले होते. डिजीटल युगातील सायबर अटॅकचा सामना करण्यासाठी आपण सुसज्ज व्हावे, ती काळाची गरज ओळखून अत्याधुनिक असे सायबर सिक्युरिटी सेंटर सुरु करण्यासाठी त्यावेळी पाऊल उचलण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात ॲडव्हान्स सायबर सेंटर झाले आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असलेला सदर विभाग जनतेमधील सायबर गुन्ह्यांची भिती निश्चितच कमी करेल. तसेच जनतेचे डिजीटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास देखील ना. फडणवीस यांनी व्यक्त केला.  

सदर सेंटरमधून दरवर्षी ५ हजार पोलिसांना सायबर तंत्रज्ञान विषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या ५ वर्षात महाराष्ट्र भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करेल असे स्पष्ट करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सदरचा केवळ प्रकल्प न राहता त्याचे कॉर्पोरेशन व्हावे, सायबर सिक्युरिटी बाबत इतर राज्यांनाही मदत करता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि आयकॉनिक असा प्रोजेक्ट असून प्रकल्प अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याने त्यांनी या प्रकल्पाचे काम हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच सायबर सुरक्षेचा १४४०७ असा हेल्पलाइन नंबर सुरु झाल्याचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजारपेक्षा जास्त!