दसरा सण निमित्त झेंडू फुले उरण बाजारात दाखल
उरण : दसरा सणानिमित्त झेंडूची फुले उरण बाजारपेठेत दाखल झाली असून, ग्राहक मोठ्या प्रमाणात झेंडूची (गोंडा) फुले खरेदी करतानाचे चित्र उरण शहरातील राजपाल नाका, आनंद नगर, बाजारपेठ, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि उरण नाक्यावर दिसत होते. महागाईमुळे झेंडू फुलांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहक आवश्यक असतील तेवढीच फुले खरेदी करत आहेत.
नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव दसरा दिनी पूर्ण होतो.दसऱ्याचे दुसरे नाव विजयादशमी. दसरा सणाचे मोठ्या उत्साहाने स्वागत होते. त्यासाठी झेंडूसह इतर फुलांची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. दसरा निमित्त झेंडू फुले १२० रुपये ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत.
उरण धार्मिक शहर असून, उरण शहराला पुरातन संस्कृती लाभली आहे. उरण शहरात प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी झेंडू फुलांना मागणी खूपच असते.
सध्या महागाई वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यात डिझेलचे भाव वाढत असल्याने वाहतुकीच्या दरात वाढ होत असल्याने यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेने झेंडूच्या फुलांचे भाव वाढले आहेत. गोंडा फुले १६० रुपये किलो या भावाने आम्ही विकतो, असे उरण मधील नाईक नगर येथील झेंडू फुले विक्रेत्या शोभा शेरे यांनी सांगितले.