पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ

ठाणे : अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्‌घाटन समारंभ ९ ऑवटोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाला. यावेळी ‘महाराष्ट्र'चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ मान्यवर दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

तर ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण सोहळ्या याप्रसंगी आ. संजय केळकर, आ. डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, हरिश्चंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ.अर्चना पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, मनोज सयाजीराव तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सुमारे ७६०० कोटी रुपयांहुन जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे) या १० ठिकाणच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरु केले गेले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसह या वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा देखील पुरविली जाणार आहे. या १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.

अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरु होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला मंजुरी मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला, असे आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, असे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिले होते. ते स्व्पन आज साकार होत आहे, याचा माझ्यासह जिल्ह्यातील सर्वांनाच मनस्वी आनंद होत आहे. खासदार डॉ. शिंदे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित असल्यामुळे ते या वैद्यकीय महाविद्यालयाचे महत्व जाणून आहेत. यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वार्थाने कौतुकास्पद आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील विविध मानाच्या तुऱ्यांपैकी एक मानाचा तुरा असेल, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले.

सद्यःस्थितीत अंबरनाथ ग्रीन सिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणि अंबरनाथ पश्चिम येथील डेंटल महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण दिले जाणार आहे. महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. या महिन्याच्या ५ तारखेपासून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून १२ नोव्हेंबर पासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी आवश्यक सर्व प्रकारची तयारी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली असून प्रयोगशाळा, सामुग्री, वर्ग, विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी वसतीगृहाचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धनके यांनी केले, तर आभार प्रर्शन डॉ. अनुजा पवार यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दसरा सण निमित्त झेंडू फुले उरण  बाजारात दाखल