भारताचे ‘अनमोल रतन' हरपले
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला नव्या सुवर्णकाळात नेणारे उद्योजक तथा टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांनी ९ ऑवटोबर रोजी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपले अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
रतन टाटा यांच्या पार्थिवावर १० ऑवटोबर रोजी सायंकाळी वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुंबईत रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी दिग्गज व्यवतींसह मोठा जनसमुदाय लोटला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, उद्योगपती दीपक पारीख, सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, मंत्री उदय सामंत गौतम अदाणी, कुमार मंगलम बिरला, प्रकाश आंबेडकर, शक्ती कांत दास, आनंद पिरामल, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.
दरम्यान, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. सचोटी, देशभक्ती, नैतिकता आणि साधेपणा यासाठी रतन टाटा ओळखले जात असतं. त्यांच्या निधानानं घरातील वडिलधारी व्यक्ती हरपल्याची भावना संपूर्ण देशाची झाली आहे. त्याअनुषंगाने रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही यावेळी संमत करण्यात आला.