नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
‘नवी मुंबई विमानतळ कमिटी'तर्फे सिडको विरोधात आंदोलन
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नावर ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीी'ने गेली ४ ते ५ वर्षे सातत्याने आवाज उठविला आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘कमिटी'ने अनेक संप, आंदोलने केली. अनेक बैठका घेतल्या, प्रशासनाशी पत्रव्यवहार केला; परंतु ‘सिडको'ने ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी'च्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने ‘कमिटी'च्या पदाधिकाऱ्यांनी ७ ऑक्टोबर पासून सीबीडी-बेलापूर नवी मुंबई येथील सिडको कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. अद्यापही सिडको प्रशासनाने आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये, ‘कमिटी'चे पदाधिकारी सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी'चे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विशाल भोईर, अखिल भारतीय किसान सभा रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगुणा डाकी, किरण केणी, प्रवीण मुत्तेमवार, यशवंत भोपी, आदि विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त आंदोलनाला बसले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांवर गेली ४ ते ५ वर्षे सातत्याने आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमांतून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. अनेक बैठका झाल्या; परंतु ‘सिडको'ने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. १ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रालयावर मोर्चाच्या अनुषंगाने २३ जुलै २०२४ रोजी ना. शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांविषयी सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीस ‘सिडको'चे तसेच नगरविकास खात्याचे प्रतिनिधी हजर होते. असे असताना आजतागायत त्या संदर्भात काहीही निर्णय झालेला नाही.
- संजय ठाकूर, सचिव-अखिल भारतीय किसान सभा.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याः
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे परंपरागत व्यवसायाचे साधन नष्ट होत असल्याकारणाने पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई द्यावी.
ज्या घरांचा सर्व्हे झालेला आहे आणि नंबर टाकलेले आहेत, अशी सर्व बांधकामे ‘सिडको'ने नाकारुन त्यांना शून्य पात्रता दिलेली आहे, अशा बांधकामधारकांना सरसकट पूर्ण पॅकेज लागू करणे.
विमानतळबाधित १० गावातील बेरोजगार युवक-युवतींना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी त्यांना रोजगारक्षम प्रशिक्षण देणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रकल्पग्रस्त म्हणून १८ वर्षांवरील प्रत्येक युवक-युवतीस विमानतळ बाधीत म्हणून दाखला देवून येणाऱ्या कंपनीसोबत ‘सिडको'ने नोकऱ्यांसाठी करार करावा.
वाघिवली गावातील प्रकल्पग्रस्तांना तातडीने घरांचे भूखंडाचा ताबा देणे.
वाघीवली गावातील ज्या लोकांनी घरे तोडलेली आहेत; परंतु ‘सिडको'ने आजपर्यंत त्यांना घरासाठी भूखंड दिलेला नाही त्यांना आतापर्यंत तसेच पुढील प्लॉटचा ताबा देऊन ओसी मिळेपर्यंत मार्केट रेटप्रमाणे घरभाडे भत्ता चालू ठेवणे.
‘सिडको'ने बांधकामे तोडली आहेत त्यांना बांधकाम खर्च १५०० रुपये प्रमाणे देण्यात यावा. ज्या घरांना १८ महिन्याच्या कालावधीसाठी घरभाडे दिले होते ते १८ महिने संपून ५ वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा घरांना अधिक घरभाडे वाढवून देण्यात यावे.
तलावपाली, चिंचपाडा येथील घर मालकांना फक्त एक पटच भूखंड दिलेला आहे. तसेच आर्थिक सहाय्य पूर्ण दिलेले नाही त्यांना तिप्पट भूखंड आणि आर्थिक सहाय्य पूर्ण पॅकेज मिळाले पाहिजे.