आ. राजू पाटील यांच्याकडून अमृत योजनेच्या कामाची पाहणी
कल्याण : २७ गावांमध्ये भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी अमृत योजना राबवली जात असून या योजनेच्या सुरु असलेल्या कामाची ‘मनसे'चे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. डोंबिवली पूर्वेतील सागांव परिसरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून याठिकाणी आ. राजू पाटील यांनी अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह पहाणी केली. योजनेचे काम समाधानकारकरित्या सुरू असून लवकरच योजना कार्यान्वित होणार असल्याने २७ गावांतील पाणी समस्या निकाली निघणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
सदर योजनेच काम सुरु करताना, जलकुंभांसाठी जागा उपलब्ध नसल्याकारणाने अनेक काम रखडली होती. यामुळे आमदार पाटील यांनी स्वतः पाठपुरावा करुन जलकुंभांसाठी जागा उपलब्ध करुन घेतल्याने रखडलेल्या सर्व जलकुंभांची काम प्रगतीपथावर सुरु केली. मात्र, काम सुरू असताना देखील २७ गावातील जनतेला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोच आहे. याचमुळे ‘केडीएमसी'चे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दावडी, सोनारपाडा,कोळे, संदप, नांदिवली, सांगाव या गावांमध्ये सुरु असलेल्या जलकुंभांच्या कामांचा त्वरित आढावा घेतला. तसेच ज्या परिसरात सव्रााधिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्या भागात तातडीने पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य देण्याची सूचना देखील केडीएमसी अधिकाऱ्यांना केली. यावेळी ‘मनसे'चे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक सहकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
२७ गावांसाठी जी अमृत योजना आली आहे, या योजनेची निविदा १९ सप्टेंबर २०१९ मध्ये काढण्यात आली होती. २ वर्षात सदर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोव्हीडमुळे सदरचा वेळ वाढवून देण्यात आला. अनेक अडचणींमुळे काम पाहिजे तसे होत नव्हते. यामुळेच वारंवार या कामाची पाहाणी करत असून त्याचाच भाग महणून आमदार राजू पाटील यांनी या कामाची पाहाणी केली. बऱ्याच ठिकाणच्या टाक्यांचे काम ८० ते ९० टक्के होत आले आहे. या टक्यांपासून मेन लाईनला नेटवर्किंग पाहिजे त्यात काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला, त्या कक्षा सोडविल्या जातील ते बघितले. एकंदरीत दिड वर्षांपूर्वी ज्या अडचणी होत्या, त्या दूर झाल्या असून आता फक्त अंमलबजावणी आणि जोडणी या गोष्टी बाकी आहेत. मार्च-एप्रिल पर्यंत योजना कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आ. राजू पाटील यांनी व्यक्त केली.