नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
१४ ऑक्टोबर रोजी शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध विषयांवर वाशी चौकात मनसेचे परिवर्तन आंदोलन
नवी मुंबई: शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयांना घेवून मनसेने काढलेल्या परिवर्तन यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर घर तिथे परिवर्तन या मोहिमेस सुध्दा नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील नागरिकांच्या मनात असलेली परिवर्तनाची भावना लक्षात घेता १४ ऑक्टोबर २०२४ रोजी वाशी मधील छञपती शिवाजी महाराज चौकात मनसे नवी मुंबई तर्फे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत परिवर्तन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद द्वारे दिली.
त्याच बरोबर LIG ची कुटुंब विस्तारापोटी वाढीव बांधकाम केलेली घरे नियमित करणे, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करणे, रुग्णालयातील विविध उपचारांचे दरपत्रक निश्चित करून रुग्णालयांच्या नफेखोरीला आळा बसवणे, CBSE, ICSE तसेच इतर खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करून पुढील पाच वर्षे फी वाढ होवू न देणे, नवी मुंबईतील प्रत्येक कंपनीत ८०% स्थानिकांना रोजगार देणे, तुर्भे येथे एस.टी. डेपो साठी राखीव भूखंडावर तात्काळ एस.टी. डेपो उभारावा, पोलीस वसाहतींची तात्काळ दुरुस्ती करणे या विषयांना घेवून मनसेचे परिवर्तन आंदोलन १४ ऑक्टोबर रोजी दिवसभर होणार आहे.
घराणेशाहीतून आलेले आणि माजी सनदी अधिकारी असणारे नेते नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयांवर न बोलता नागरिकांशी, पक्षाशी, कार्यकर्त्यांबरोबर, आपल्या तत्वाशी प्रतारणा करून फक्त खुर्चीचे राजकारण करत आहेत. मनसेने बामणडोंगरी, ८००० सिडको सोडत धारकांचे जवळपास ६०० कोटी वाचवले. तसेच ४ वर्षांपूर्वी १५००० सिडको सोडत धारकांचे मुद्रांक शुल्क लाखो रुपयांवरून केवळ १००० करून १५० करोड वाचवले. तसेच ५ वर्षांपूर्वी कंत्राटी कामगारांचा पगारामधील जवळपास १५० कोटींचा फरक मिळवून दिला. मनसे मुळे विष्णुदास भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले. मनसेने ४६ कोटींचा अवैध डाळ साठा पोलिसांना पकडुन देऊन महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या आंदोलनानंतर सायन-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण झाले. मनसेच्या आंदोलनानंतर अशी लोकहिताची कामे करून व कधीही पक्ष न बदलता मनसेचे कार्यकर्ते निवडणुकीला सामोरे जात असताना बेलापूर विधानसभा साठी वारंवार पक्ष बदलणारे सत्ताधारी नेते प्रयत्न करत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत गजानन काळे यांनी व्यक्त केली.
सिडकोने नवी मुंबईतील जमीन फ्री होल्ड केली अशा प्रकारचे खोटे बॅनर लावणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांनी जनतेची माफी मागावी. तसेच प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित केल्याचा फसवा शासन निर्णय काढणाऱ्यांनी धूळफेक बंद करावी, असेही गजानन काळे यांनी नमूद केले. नवी मुंबईतील नेत्यांनी ज्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र नाही दिले अशा इमारतीत स्थानिक आमदार व माजी सनदी अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यालये थाटली आहेत. त्यांच्यावर महापालिका आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा. सत्ताधारी पक्षाच्या अर्थात भाजपच्या जिल्हाअध्यक्षांना महानगरपालिका आयुक्त दबावाखाली मनपाच्या शासकीय कार्यक्रमात बोलावतात. आयुक्तांनी "लाडका जिल्हाअध्यक्ष" योजना घोषित केली आहे का? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला. तसेच ज्या नवी मुंबईकरांना १४ ऑक्टोबर रोजी परिवर्तन आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ८६५२८८८००७ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले.
मनसेच्या या पत्रकार परिषदेत शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, कामगार सेना शहरअध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, महिला सेना उपशहरअध्यक्ष दीपाली ढवुळ, अनिता नायडू, शहर सचिव यशोदा खेडस्कर, मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, श्याम ढमाले, निखिल गावडे व इतर मनसे पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.