दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडको घरांची सोडत
नवी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांपैकी २६ हजार घरांची सोडत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यासाठी सिडको सज्ज झाली आहे. त्याकरिता ‘सिडको'कडून घर खरेदीदारांकडून सर्व प्रथम नोंदणी अर्ज मागविणार आहे. नोंदणी झालेल्या अर्जदारांची आवश्यक कागदपत्रे (केवायसी डॉक्युमेंट) तपासल्यानंतर पात्र अर्जदारांना प्राधान्यक्रम देऊन पसंतीच्या घरांची नोंदणी करता येणार आहे.
येत्या ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाशी येथे ‘महाराष्ट्र भवन'च्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने त्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सिडको घरांची सोडत काढण्याचा निश्चय ‘सिडको'ने केला आहे. त्यादृष्टीने ‘सिडको'चा मार्केटिंग विभाग आणि व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी कार्यरत झाला आहे.
‘सिडको'च्या इतिहासात प्रथमच २६ हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ग्राहकाला आपल्या पसंतीचे घर निवडण्यासाठी १५ घरांचे पर्याय सिडको उपलब्ध करुन देणार आहे. ज्या पसंती क्रमाला एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील, त्या घरासाठी सोडत निघून विजेत्याला ते घर उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे ‘सिडको'च्या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत, पैसे भरण्याची मुदत, पसंतीच्या घरासाठी पर्याय निवडण्याची आणि सोडतीची मुदत आदिंचे वेळापत्रक सिडको घर विक्रीच्या जाहिरातीत नमूद करणार आहे.
दरम्यान, ‘सिडको'चे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी यापूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी घरांची सोडत काढण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव सदरची नियोजित सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. गेले काही महिने सिडको घरांची सोडत काढली जाणार असल्याची घोषणा करुन नंतर सदर घरांची सोडत सातत्याने ‘सिडको'कडून पुढे ढकलली जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहित लक्षात घेऊन आणि दसरा सणाचे औचित्त साधून नवरात्रौत्सवातच सिडको घरांची घोषणा केली जाणार आहे. या सोडतीत दुर्बल घटकांसाठी १३ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरे आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ५० टक्के घरे तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर, खारकोपर, बामणडोंगरी गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा या गृहनिर्माण सोडतीत समावेश आहे.
-विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.