महिला सुरक्षेसाठी ‘शिवसेना'ची ‘मशाल' पेटली
उल्हासनगर : महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारच्या उदासीनतेचा निषेध नोंदवण्यासाठी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'तर्फे उल्हासनगर ते कल्याण पूर्व पर्यंत ‘मशाल रॅली'चे ६ ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. या ‘रॅली'चे नेतृत्व शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केले. तसेच अनेक शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना आणि युवती सेना पदाधिकारी-कार्यकर्ते या ‘रॅली'मध्ये सहभागी झाले होते.
महिला आणि मुलींवरील अत्याचार आणि हत्यांचे वाढते प्रकार चिंताजनक असून, समाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकार पूर्णपणे निष्क्रीय राहिल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केला. कल्याण तिसगाव येथील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येचा उल्लेख करत, अजुनही आरोपीला शिक्षा न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. शिळफाटा, उरण, बदलापूर येथील हत्या आणि अत्याचाराचे उदाहरणही या ‘रॅली'मध्ये समोर आणले गेले. यासह वि्ीलवाडी पोलीस ठाण्यातच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या ब्लेड हल्ल्याचा धक्कादायक प्रसंगही उघड करण्यात आला.
जिथे पोलीसच सुरक्षित नाही, तिथे सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवाल बोडारे यांनी सरकारला विचारला. धनंजय बोडारे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात देवी महिषासुरमर्दिनीला साकडे घालत, या दुष्टशक्तींवर मात करण्यासाठी ‘मशाल' पेटवावी लागली, असे स्पष्ट करून त्यांनी नवरात्रीच्या काळात सदरचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बदलापुरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण' योजना सुरु करून महिलांना आर्थिक मदत दिली. मात्र, महिला सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला. याच कारणामुळे ‘शिवसेना' ‘मशाल रली'चा मार्ग निवडला आहे, असे धनंजय बोडारे म्हणाले. ‘रॅली'मध्ये उपस्थित महिलांनीही आपली अस्वस्थता आणि राग व्यक्त केला. महिला सुरक्षेसाठी केवळ योजना नव्हे, तर ठोस उपाययोजना लागतील, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला.
सदर रॅली उल्हासनगरातील जिजामाता उद्यान येथून सुरू होऊन कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपर्यंत गेली. शिवसैनिकांच्या जोशपूर्ण घोषणांनी शहराच्या रस्त्यांवर आंदोलकांची लाट दिसत होती. महिलांच्या हक्कांसाठी पेटलेल्या मशालींसह निषेध मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडली.