‘काँग्रेस'चा अर्बन नक्षलवादाला पाठिंबा
पंतप्रधानांचा ‘काँग्रेस'सह ‘महाविकास आघाडी'वर हल्लाबोल
ठाणे : महाराष्ट्र मध्ये ‘महायुती सरकार'ने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील बहिणींच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होत आहेत. परंतु, ‘महाविकास आघाडी'ला लाडवया बहिणींचे भले पहावत नाही. ‘महाविकास आघाडी'ला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील. बहिणींच्या हातामधील पैसा दलालांच्या हातामध्ये जाईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केला. दरम्यान, काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाविकास आघाडी'वरही भाषणातून निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी ठाणे-घोडबंदर रोडवरील बोरीवडे-कासारवडवली येथे ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपुजन-उद्घाटन तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. शंभूराज देसाई, ना. रविंद्र चव्हाण, ना. अदिती तटकरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस, खा. सुरेश म्हात्रे, ‘सिडको'चे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. गणेश नाईक, आ. प्रताप सरनाईक, आ. मंदाताई म्हात्रे, आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली भूमीगत मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झः मेट्रो मार्गिका-३ टप्पा-१ (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपुजन, पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडानगर, घाटकोपर ते आनंदनगर ठाणे प्रकल्पाचे भूमीपुजन, नैना नगररचना परियोजना अंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमीपुजन, ठाणे महापालिकेच्या नूतन मुख्यालय इमारतीचे भूमीपुजन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार असे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस'ला लक्ष्य करीत आज अर्बन नक्षल काँग्रेस चालवत असल्याचा आरोप केला. काँग्रेस उघडपणे त्यांच्यासोबत उभी आहे. सरकार बनवण्याचे स्वप्न बघत आहे. ‘काँग्रेस'ला त्यांची व्होटबँक एक राहील; पण बाकीचे लोक सहज वेगळे होतील, असे वाटत आहे. समाजाची विभागणी करा, लोकांची विभागणी करा; हाच ‘काँग्रेस'चा हेतू आहे. त्यामुळे आपल्याला भूतकाळापासून बोध घ्यावा लागेल. ‘हम बटेंगे तो बाटनेवाले मैफील सजायेंगे' असे लक्षात ठेवून ‘काँग्रेस'चे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थितांना केले.
महाराष्ट्राचा विकास हेच ‘महायुती सरकार'चे ध्येय आहे. तर दुसरीकडे ‘महाविकास आघाडी सरकार'ने विकास ठप्प करण्याचे काम केले आहे. त्यांना विकास कामांना लटकाना, अटकाना आणि भटकाना याच गोष्टी येतात. मुंबई मेट्रा-३ त्याचेच उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
‘मेट्रो-३'ची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये सुरु झाली. त्यावेळी ६० टक्के काम पूर्ण झाले होते. यानंतर ‘महाविकास आघाडी सरकार'च्या अडीच वर्षाच्या काळात ‘मेट्रो-३'चे काम थांबवले गेल्याने आज या प्रकल्पाची किंमत १४हजार कोटींनी वाढली आहे. तो पैसा महाराष्ट्रातील करदात्यांच्या कष्टाचा पैसा होता. ‘मविआ'चे नेते महाविकास विरोधी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच त्यांनी बुलटे ट्रेनलाही विरोध केला होता. मविआ तुमचे प्रत्येक काम थांबवत होते. त्यामुळे तुम्हाला आता त्यांना थांबवायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आ. आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत बालहट्टामुळे ‘मेट्रो'चे काम बंद पाडल्याचा आरोप केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.