उरण मध्ये शारदोत्सवाला सुरुवात; देवी मंदिराना सजावट

उरण : उरण तालुक्यात शारदोत्सवाला सुरुवात झाली असून, आदिशक्तीचा जागर सुरु झाला आहे. नवरात्रौत्सवासाठी अनेक गावातील देवीची मंदिरे सजली आहेत. उरणमध्ये सार्वजनिक ९९ मुर्ती, ११ घट आणि दोन फोटोंची स्थापना करण्यात आली आहे.  या नवरात्रौत्सवाची विशेषता तरुणाईत मोठी उत्सुकता लागून राहिलेली असते. उरण तालुक्यातील काही ठराविक नवरात्रौत्सव मंडळांद्वारे गरबा रास, दांडिया नृत्याबरोबरच विविध सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उरण पोलीस ठाणे हद्दीत ६५, न्हावा-शेवा पोलीस ठाणे हद्दीत २० तर मोरा सागरी पोलीस ठाणे हद्दीत १४ सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ तर्फे नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहेत. या ९९ सार्वजनिक नवरात्री मंडळांनी ९९ देवी मुर्तींची स्थापना केली आहे. उरण शहरातील गुरुकुल ॲकॅडमी, जवाहरलाल नेहरु बंदर कामगार वसाहतीतील ऐश्वर्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचा ऐश्वर्या रास गरबा, चिरनेर येथील शिवसेना प्रणित नवरात्रौ उत्सव मंडळ, करंजा येथील नवापाडा मित्र मंडळाचा फक्त महिलांसाठी पारंपारीक वेशभूषा ड्रेसकोडच्या तालावर थिरकणारा गरबा आणि परिसरात इतर ठिकाणी गरबा रास नृत्यांना सुरुवात झाली आहे.

उरण परिसरात आई जगदंबेची अनेक मंदीरे आहेत.त्यापैकी करंजा येथील द्रोणागिरी देवी ,उरण शहरातील उरणावती देवी, डोंगरीची अंबादेवी, नविन शेवा मधील शांतेश्वरी देवी,जसखार येथील रत्नेश्वरी देवी, फुंडे येथील घुरबादेवी, चिरनेर येथील इंद्रायणीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान असलेली आणि मोरा येथील एकवीरा देवी,पीरवाडी येथील मागीणदेवी, उरण शहरातील शितलादेवी, न्हावा येथील गावदेवी, गव्हाण येथील शांतादेवी आदी अनेक देवी मंदिरात नवरात्री उत्सव दरम्यान देवीचा जागर केला जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या वतीने वाशीमध्ये 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान भव्य शारदोत्सव