पनवेल विधानसभा मतदारसंघात ८५ हजारांपेक्षा अधिक दुबार, बोगस मतदार
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द मतदारयादी मध्ये ८५ हजारांपेक्षा अधिक नावे दुबार आणि बोगस आहेत, असा दावा करीत, याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादीतील दुबार आणि बोगस मतदार नावे रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे, अशी माहिती शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल मधील शेकाप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, शिवसेना (उबाठा) नेतेे बबनदादा पाटील, काँग्रेस नेते सुदाम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत, माजी पनवेल पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार मतदान करणार आहेत. प्रसिध्द झालेल्या मतदार यादी मध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघात ८५ हजारांपेक्षा अधिक नावे दुबार आणि बोगस असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, अशी माहिती बाळाराम पाटील यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करुन पनवेल विधानसभा मतदारसंघातील दुबार आणि बोगस मतदार नोंदणीविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे, असे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाकडे अद्ययावत मतदार नोंदणी सॉपटवेअर असल्याने त्याचा वापर करुन दुबार आणि बोगस नोंदणीविरोधात अभियान चालविण्यात यावे, अशी मागणी बाळाराम पाटील यांनी यावेळी केली.
पनवेल विधानसभा मतदारसंघात २५, ८५५ मतदारांची दुबार नोंदणी झालेली आहे. १५० ऐरोली मतदारसंघातील १६,०९६ नावे, १९० उरण मतदारसंघातील २७, २७५ नावे आणि १५१ बेलापूर मतदारसंघातील १५,३९७ नावे पनवेल मतदारसंघात अंतर्भूत झालेली आहेत. याव्यतिरिक्त ५८८ नावांचा कन्नड अथवा अन्य दक्षिण भारतीय भाषांचा पत्ता नमूद आहे. संपूर्ण नाव नमूद नाही, अशी माहिती बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व दुबार आणि बोगस नावांना मतदार यादीतून वगळण्यात यावे, शेकाप कार्यकर्त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघ मतदारयादीचा अभ्यास करुन शोधलेली २ हजार १६० बोगस नावे तसेच मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.- बाळाराम पाटील, माजी आमदार - शेतकरी कामगार पक्ष.