मतदार यादीत अनधिकृत झोपडपट्टी मधील रहिवाशांची नावे कशी?
वाशी : सर्वसामान्य नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवताना रहिवासी पुरावे देऊन, अनेक कसरती करुन देखील कधी कधी सर्वसामान्य नागरिकांची नावे मतदार यादीत नोंदवली जात नाहीत. मात्र, अनधिकृत झोपडी मधील रहिवाशांची नावे सरसकट मतदार यादीत नोंदवली जात असल्याने नाव नोंदणी करताना गैरप्रकार होत असल्याचा संशय व्यक्त करत मतदार नाव नोंदणीत रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्र तपासण्याची मागणी होत आहे.
‘सिडको'ने वाशी सेक्टर-१९ एफ मध्ये भूखंड क्रमांक-१ वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) निगडित कामाकरिता आरक्षित ठेवला आहे. मात्र मागील कित्येक वर्षांपासून सदर भूखंड मोकळा असल्याने त्यावर भूमाफियांकडून अतिक्रमण केले जात आहे. याआधी याठिकाणी झोपड्या बांधून विकल्या जात असल्याच्या आणि झोपडीधारकांकडून पाण्याचे पैसे उकळले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अल्पावधीतच मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. झोपडपट्टी वाढल्याने रात्री-अपरात्री जुगाराचे डाव रंगत असून, सदर ठिकाण अंमली पदार्थ विक्रेत्यांचे आश्रयस्थान बनले आहे. वाशी सेक्टर-१९ एफ मधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय तसेच रात्री देहविक्रीचा व्यवसाय जोरात सुरु असल्याचा आरोप होत आहे. या व्यवसायांचा नाहक त्रास वाशी सेक्टर-२६ मधील महिला वर्ग, लहान मुले-मुली आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमणावर कारवाई करावी म्हणून येथील नागरिकांनी नवी मुंबई महापालिका, सिडको तसेच नवी मुंबई पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुन देखील ठोस कारवाई केली जात नाही. सदर अनधिकृत झोपडपट्टी वसाहतीवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने तक्रारदारांच्या मतदार यादीतच येथील नावे समाविष्ट करण्याचा प्रकार केला आहे. नुकतीच विधानसभा २०२४ निवडणुकीची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे.
वाशी सेक्टर-२६ मधील मतदारयादीत एकतानगर झोपडपट्टी मधील नागरिकांची नावे यादी क्रमांक-३८८ मध्ये नोंदवण्यात आली आहेत.त्यामुळे सदर झोपडपट्टीवर कारवाई करण्याऐवजी त्यांची नावे मतदार यादीत नोंदवून प्रशासनाने वाशी सेक्टर-२६ येथील रहिवाशांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे मतदार नाव नोंदणीत रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्र तपासण्याची मागणी वाशी सेवटर-२६ मधील नागरिकांद्वारे होत आहे.
-------------------------------------------
वाशी सेक्टर-१९ एफ मधील अनधिकृत झोपडपट्टी वसाहतीवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने अनधिकृत झोपडपट्टी वसाहतीतील रहिवाशांना अधिकृत मतदार देखील केले आहे. त्यामुळे अनधिकृत झोपडपट्टी वसाहतीतील रहिवाशांची नावे मतदारयादीत नोंदवली कोणी?, नाव नोंदवताना कुठले पुरावे सादर केले याची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणी आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. - संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई प्रतिष्ठान.