बेलापूर विधानसभाच्या मतदार यादीत प्रचंड घोळ
मनसे आक्रमक; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी व त्याची पुरवणी यादी प्रकाशित केली आहे. १५१ बेलापूर विधानसभेमध्ये एकूण ४ लाख १५ हजार ४३६ नावे असून या सर्व मतदार याद्यांची सखोल छाननी करताना मनसेला काही गंभीर अनियमितता आढळून आल्याचे मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे.
सदर मतदार यादी मध्ये जवळपास १५ हजार नावे दुबार व जवळपास १८ हजार मतदार असे आहेत की ज्यांचा मतदार यादीतील पत्यानुसार शोध घेतला असता ते आढळून आलेले नसल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. ही नावे कदाचित बोगस नोंदवलेली असल्याचे मनसेने म्हटले आहे.
याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटून मतदार याद्यांच्या पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या कारभारामुळे पारदर्शक व नि:ष्पक्ष निवडणूक ह्या संकल्पनेला छेद जात असल्याचे मनसेने आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. तसेच याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सदर बोगस व दुबार नावे वगळली न गेल्यास याविरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सह सचिव अभिजित देसाई, मनपा कामगार सेनेचे आप्पासाहेब कोठुळे, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, रोजगार सेनेचे सनप्रित तुर्मेकर, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष श्रीकांत माने, अनिकेत पाटील, रस्ते आस्थापनेचे संदीप गलुगडे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे उपस्थित होते.