नवरात्रौत्सवात नारळ दरात वाढ
वाशी : शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत असून, आता नारळाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल आणि डाळी महागले आहेत. त्याचबरोबर नवरात्री उत्सवात सर्वाधिक मागणी असणाऱ्या नारळांच्या किंमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. नारळाच्या ठोक भावांमध्ये ८ ते १० रुपयांनी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्र सण दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला शुक्ल पक्षामध्ये येतो. नवरात्री उत्सवात मातीमध्ये वेगवेगळे धान्य टाकून त्यामध्ये नऊ दिवस मातीचे घट मांडून त्याची पूजा केली जाते. या घटात ठेवल्या जाणाऱ्या नारळाला अधिक महत्त्व असते. यादरम्यान नवरात्री उत्सव काळात मोठ्या संख्येने नारळाला मागणी असते.
दरम्यान, गणपती सणात वाढलेले नारळ दर पितृपक्षात नियंत्रणात आले होते. मात्र, नारळाचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत.घाऊक बाजारात मागील आठवड्यात ८ ते १० रुपयाने नारळ दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वी किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये असलेले नारळाचे दर आता ४० ते ५० रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. अचानक वाढलेल्या नारळ दराने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
नवरात्री उत्सवाच्या तोंडावर नारळ दरामध्ये काही प्रमाणात वाढ होते. गणपती उत्सवानंतर स्थिर असलेल्या नारळाच्या किंमतीमध्ये आता वाढ झाली आहे. नवरात्री उत्सवात नारळाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ अपेक्षित असते. कारण नवरात्री उत्सवात नारळाला मागणी जास्त असते. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)बाजारपेठेत येणारे नारळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून येतात, असे व्यापारी संभाजी शिंदे यांनी सांगितले.