उल्हासनगर शहराच्या स्वच्छतेचा नवा अध्याय

उल्हासनगर : उल्हासनगर शहर विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत योजना २.० अंतर्गत उल्हासनगर शहरातील मलनिःस्सारण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे ऑनलाईन भूमीपुजन संपन्न झाले. सदर सोहळा विज्ञान भवन, नवी दिल्ली येथून ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आला.

दरम्यान, शहराच्या विकासाच्या दिशेने टाकलेले सदरचे पाऊल उल्हासनगरसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दुसऱ्यांदा उल्हासनगरच्या विकास कामाचे भूमीपुजन होणे शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे.

उल्हासनगर शहरातील सिंधू भवन येथे यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यात आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सदर महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला.

उल्हासनगर शहरातील मलवाहिन्या गेल्या काही दशकांपासून जीर्ण झाल्या होत्या. २००५ रोजीच्या महापुरानंतर या मलवाहिन्या मोठ्या प्रमाणात खराब झाल्या होत्या. त्यामुळे शहरातील सांडपाणी थेट उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात होते. ज्यामुळे शहरातील पर्यावरणावर आणि पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवर प्रतिकुल परिणाम होत होता. अमृत योजना २.० अंतर्गत उल्हासनगर शहरासाठी ४१६.६६ कोटी रुपयांची मलनिःस्सारण योजना मंजूर झाली असून यामध्ये २२८ किलोमीटर लांबीची मलवाहिनी उभारणे, १९.५० द.ल.लि. क्षमता असलेले मलशुध्दीकरण केंद्र उभारणे, मालमत्तांना मलवाहिन्या जोडण्या देणे, रस्ते पुर्ववत दुरुस्त करणे, मलवाहिन्यासाठी सम्राट अशोकनगर नाला, रेल्वे क्रॉसींग नाला, भरतनगर नाला, अंबिका नाला या ठिकाणी मलवाहिन्यांसाठी रेल्वे क्रॉसिंग करणे, आदि कामे ‘अमृत योजना'मध्ये अंतर्भुत असून त्यानुषंगाने उल्हासनगर शहरात ३८ कि.मी. मलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. तसेच शहरात १२१० मॅनहोल तयार करण्यात आलेले आहेत. ‘अमृत योजना'च्या तिसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारेल आणि याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल. पर्यावरणातील सुधारणा असा या योजनेचा मुख्य हेतू असून त्यामुळे शहराच्या शाश्वत विकासात मोठे योगदान मिळणार आहे.

सदर कार्यक्रमास आमदार कुमार आयलानी, आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, दिव्यांग कल्याण योजना विभागप्रमुख राजेश घनघाव, सुरक्षा विभागप्रमुख यशवंत सगळे, अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे, सिस्टीम अनालिस्ट श्रध्दा बाविस्कर, तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी केले.

उल्हासनगर महापालिका तर्फे स्वच्छतादुतांचा सन्मान
उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवाडा मध्ये शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सहभाग घेतलेल्या स्वच्छतादुतांचा समारोपाच्या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी स्वच्छतादुतांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. स्वच्छता पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स आणि विविध सामाजिक संस्थांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार कुमार आयलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. शहर जितके स्वच्छ राहील, तितका आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल, असे आ. कुमार आयलानी म्हणाले.

महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी कार्यक्रमाच्या समारोपात पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करतानाच वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला.

यावेळी आर.के.टी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम' या विषयावर पथनाट्य सादर केले. वेदांत कॉलेज, एस. एस. टी. कॉलेज, सेंचुरी रेयॉन शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता अभियान'मध्ये सहभाग घेतला. यावेळी सहभागी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवरात्रौत्सवात नारळ दरात वाढ