‘नमुंमपा'चा स्वच्छता महोत्सव जल्लोषात साजरा

नवी मुंबई : १७ सप्टेंबरपासून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उत्साहात सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा' पंधरवड्याची आणि ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' अभियानाची सांगता वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ७५०० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्यतम ‘स्वच्छता महोत्सव'च्या माध्यमातून जल्लोषात संपन्न झाली. ‘निश्चय केला, नंबर पहिला' या ध्येयवाक्याच्या जोरदार निनादात सारे वातावरण भारुन गेले होते.

याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिरीष आरदवाड, स्वच्छता आयकॉन सुलेखनकार अच्युत पालव, साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी, अभिनेत्री राधिका देशपांडे, दिपाली पानसरे, केतकी नारायण, भाग्यश्री मोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

‘स्वच्छता ही सेवा' पंधरवड्याची सांगता असली तरी पुढे कायम राखावयाच्या स्वच्छतेचा शुभारंभ असल्याचे मत व्यक्त करीत ‘नमुंमपा'ने सदर मोहिमेत ज्यांच्या खांद्यावर उद्याचे भविष्य आहे, अशा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी करुन घेतल्याबद्दल खा. नरेश म्हस्के यांनी प्रशंसा केली. स्वच्छता उपदेश करण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्ष कृती करुनच स्वतःपासून सुरूवात करायला हवी, असे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत लहान वयापासूनच त्यांच्यावर स्वच्छतेचा संस्कार करण्याचा उद्देश विविध स्पर्धात्मक उपक्रमांतून सफल झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यापुढील काळात वेस्ट टू एनर्जी तसेच टेक्सटाईल रिसायकलींग यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईचा नावलौकिक देशपातळीवर अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१२ प्रकारचे संस्कार असतात याची माहिती देत अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी आपल्याला कचरा कमी करुन तसेच कचऱ्याचे घरातूनच वर्गीकरण करून सफाई मित्रांचे काम कमी करायचे आहे, असे आवाहन केले.

यावेळी जगप्रसिध्द आफ्रिन बॅन्डच्या तालावर उपस्थित सूरांसमवेत रंगले आणि त्यांच्यासह ‘वंदे मातरम्‌'चा गजर केला गेला. सदर ‘महोत्सव'मध्ये सफाईमित्र एसटीपी ऑपरेटर निकेश पाटील आणि रमेश इंगळे तसेच स्वच्छतामित्र महादेव सोनावणे आणि स्वच्छता सखी सुजाता भोसले यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे प्रत्येकी २-२ लाख असे ४ लाख रुपये रक्कमेचे विमा कवच प्रातिनिधिक स्वरुपात प्रदान करण्यात आले.

तसेच शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक विविध स्पर्धांतील १० हजारहून अधिक स्पर्धकांमधून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धेत सेंट मेरी स्कुल वाशीचा विद्यार्थी गितेश सहारकर तसेच वक्तृत्व स्पर्धेत मॉडर्न स्कुल वाशीचा विद्यार्थी दक्ष दत्तात्रय वगरे यांचा समावेश आहे. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता आयसीएल स्कुल वाशीचा विद्यार्थी विजय प्रकाश वायदंडे आणि द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी नमुंमपा शाळा क्र.२९ जुहूगाव येथील आर्या आवळे यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.

याशिवाय ‘लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस'च्या रिचा समित, ‘डॉ. नानासाहेब धम्रााधिकारी प्रतिष्ठान'चे श्रीसदस्य प्रतिनिधी, तृतीयपंथियांच्या ‘किन्नर माँ ट्रस्ट'च्या प्रमुख अनिता वाडेकर, ‘एनएसएस युनिट'चे जिल्हा समन्वयक नितीन देशमुख, कन्सर्टो पेमेंट सिस्टीम आर्कटिेक्ट यांचाही गौरव करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायु प्रदूषणाच्या विळख्यात ‘नवी मुंबई'