सन २०५५ पर्यंत ‘नवी मुंबई'ला ११७५ एमएलडी पाण्याची गरज

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास बघता वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरिता महापालिकेने नियोजन सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी पाताळगंगा नदीतून तसेच भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे पाठविला आहे. याद्वारे नवी मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागविली जाणार आहे.

सद्यस्थितीत दैनंदिन ४५० द.ल.लि. क्षमता असणाऱ्या ‘नमुंमपा'च्या मोरबे धरण प्रकल्पाद्वारे नवी मुंबई महापालिका क्षेत्रास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नवी मुंबई सुनियोजित शहर असून त्यानजिक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच ट्रान्स हार्बर लिंकिग रोड, सिडको मार्फत राबविण्यात येणारी सामुहिक गृहनिर्माण योजना यासारख्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील ‘सिडको'ने बांधलेल्या जुन्या इमारती तोडून पुनर्विकासाची कामेही महापालिका क्षेत्रात सुरु आहेत.

याशिवाय शासनाच्या नवीन युनिफाईड शहर विकास नियंत्रण नियमावली मधील तरतुदीप्रमाणे चटई क्षेत्रामुळे आणि ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत नव्याने समावेश झाल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशा सर्व बाबींचा विचार करुन नवी मुंबई शहराचा झपाटयाने होणारा विकास पाहता, भविष्यातील वाढणाऱ्या लोकसंख्येस सद्यस्थितीतील जलस्त्रोत आणि त्याद्वारे होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा पडणार आहे. सन २०५५ पर्यंत नमुंमपा क्षेत्रातील ४४.२० लाख इतक्या वाढीव लोकसंख्येस साधारणतः ११७५ द.ल.लि. पाण्याची गरज भासणार आहे.

‘नमुंमपा'ने शहराच्या पाणी पुरवठयाकरिता नवीन जलस्त्रोत शोधण्यासाठी प्राथमिक सल्लागाराची नेमणूक केलेली आहे. तसेच नवीन जलस्त्रोताकरिता महापालिका मार्फत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे. या ‘समिती'ने नवीन जलस्त्रोत निर्मितीकरिता महापालिकेने पाताळगंगा नदीतून आणि भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यावर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून पाणी उपलब्ध होण्यास पर्यायांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे सयुक्तिक राहिल असे सूचविले आहे. त्या अनुषंगाने ‘नमुंमपा'ने नेमणूक केलेल्या सल्लागाराने नवीन जलस्त्रोतासाठी प्राथमिक संकल्पना अहवाल  महापालिकेस सादर केलेला आहे.

त्याला आयुक्तांची ११ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. तसेच नवीन जलस्त्रोत प्रकल्प अंमलबजावणीकरिता निर्माण होणारे गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरणविषयक अभ्यास, सुसाध्यतेची पडताळणी तसेच संशोधनात्मक अभ्यास, कायदेविषयक, अर्थविषयक अन्वेषण अशा विविध बाबींसाठी अनुभवी तज्ञ तांत्रिक सल्लागाराच्या निवडीकरीता महापालिका मार्फत निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

‘नमुंमपा' क्षेत्रासाठी सन २०५५ सालापर्यंत आवश्यक असणारी प्रतिदिन एकूण पाणी मागणी ११७५ द.ल.लि. पूर्ण करण्यासाठी सध्या मोरबे धरण आणि एमआयडीसी यांच्याकडून उपलब्ध होणारे ६५ द.ल.लि. पाण्याव्यतिरिक्त महापालिकेला साधारणतः प्रतिदिन ७०० द.ल.लि. इतक्या वाढीव पाणी आरक्षणाची आवश्यकता आहे. सदर वाढीव पाणी आरक्षण पाताळगंगा नदीतून आणि भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती केल्यानंतर विसर्ग होणाऱ्या अवजलामधून उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव ‘नमुंमपा'मार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने त्याचा पाठपुरावा अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे करीत आहेत. सदर प्रस्तावास ‘कोकण पाटबंधारे विकास महामंडळ'ची तत्वतः मान्यता प्राप्त होताच पुढील अनुषंगिक कार्यवाही करणे महापालिकेला शक्य होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'चा स्वच्छता महोत्सव जल्लोषात साजरा