‘केडीएमसीे'वर महिलांचा ‘मडका मोर्चा'
पाणी प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये बसू न देण्याचा इशारा
कल्याणः पाणी पुरवठा वितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका कल्याण पश्चिम मधील काही भागांमध्ये बसत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी, हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागण्याची वेळ प्रशासनाच्या सावळा गोंधळ कारभारामुळे आली आहे. अनेकदा तक्रारी करुनही ‘केडीएमसी'कडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ३० सप्टेंबर रोजी शेकडो महिलांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर रिकामे माठ (घागर) घेऊन मोर्चा काढला. यावेळी महिलांनी मडके फोडून ‘केडीएमसी'च्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध करीत संताप व्यक्त केला.
कल्याण पश्चिम मधील बेतूरकरपाडा, चिकणघर, काळातलाव आदि भागांतील नागरिकांना पाणीटंचाई आणि दुषित पाणी पुरवठा समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणी समस्येबाबत नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी पदरी मात्र आश्वासन दिले जाते. समस्या कायम, याबाबत प्रशासनाकडून ठोस काहीच कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
‘केडीएमसी'च्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी टंचाई आणि दुषित पाण्याचा सामना करावा लागतो, असा आरोप करत शेकडो संतप्त महिलांनी ‘केडीएमसी' मुख्यालयावर मडके मोर्चा काढला. ‘चिकणघर काळा तलावचा सर्वांगीण विकास खुंटला, पाणी आणि रस्त्याकरिता जनतेचा उद्रेक मोर्चा', असे बॅनर हातात घेऊन महिलांनी घोषणाबाजी करत मडके फोडून निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना महिलांनी पाणी बिले वसूल केली जातात; मात्र पाणी दिले जात नाहीत. पाणी बिले उशिराने भरली तर थकीत बिलांवर व्याज लावले जाते. आम्हाला महिनोन्महिने पाणी टंचाईला समारे जावे लागत आहे. पाणी टंचाई प्रश्न कधी सुटणार? अशी संतप्त प्रतिक्रिया ‘खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना'चे अध्यक्ष उमेश बोरगावकर यांनी दिली.
दरम्यान, या मोर्चा नंतर जर महापालिका प्रशासनाला जाग आली नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी जलद कार्यवाही न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बसू दिले जाणार नाही, असा इशारा उमेश बोरगांवकर यांनी दिला आहे.